नव्या जिल्हाध्यक्ष निवडीपर्यंत राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून जिल्हा समन्वय समिती स्थापन

 

रत्नागिरी | प्रतिनिधी : आपल्या काकापासून फारकत घेत राष्ट्रवादी नेते अजित पवार हे आमदारांसह शिवसेना भाजपा सरकारला जाऊन मिळाले आणि पंधरा दिवसानंतर राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थ मंत्री म्हणून विराजमान सुद्धा झाले.

मात्र या मोठ्या राजकीय घडामोडी नंतर राष्ट्रवादी कॉंग्रेस मध्ये अजित पवार आणि शरद पवार असे दोन गट पडले आहेत. रत्नागिरी जिल्ह्यात राष्ट्रवादी कॉंग्रेसचे एकमेव आमदार शेखर निकम यांनी अजित पवार यांच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतला आहे.
परंतु रत्नागिरी तालुक्यासह जिल्ह्यातील काही ठिकाणी मात्र शरद पवार यांना मानणारा गट आहे. या सर्वांचा एक समन्वय मेळावा १२ जुलै रोजी रत्नागिरी येथे झाला. त्याच नेतृत्व चिपळूणचे माजी आमदार रमेश कदम यांनी केले. यावेळी अनेक तालुकाध्यक्षांसह अनेक पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार गटाचे निरीक्षक शेखर माने हेही उपस्थित होते. त्यावेळी संघटनात्मक रित्या तत्काळ काही नियुक्या केल्या जातील असे सुतोवाच करण्यात आले होते.

त्याप्रमाणे रत्नागिरीचे राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष बाबाजी जाधव हे अजित पवार गटासोबत गेल्याने नवीन जिल्हाध्यक्ष नेमाने अपेक्षित आहे. मात्र तोपर्यंत एक समिती शरद पवार गटाकडून गठीत करण्यात आली असून त्यामध्ये माजी आमदार रमेश कदम यांच्यासह माजी जिल्हाध्यक्ष कुमार शेट्ये, बशीर मुर्तुझा, रत्नागिरी तालुकाध्यक्ष राजन सुर्वे, राजापूर तालुकाध्यक्ष आबा आडिवरेकर, गुहागर तालुकाध्यक्ष पद्माकर आरेकर, दापोली तालुकाध्यक्ष नितीन मयेकर, लांजा येथील महमंद राखंगी, मंडणगड येथील प्रकाश शिगवण, खेड येथील अमित कदम यांचा समावेश आहे.