झाड तोडल्याच्या गैरसमजातून शेतकऱ्यावर कोयत्याने हल्ला

तळवडे बादेवाडी येथील प्रकार : गुन्हा दाखल

सावंतवाडी । प्रतिनिधी : शेतात तोडून टाकलेले झाड संबंधित शेतकऱ्याने तोडल्याचा गैरसमज करून घेत झालेल्या वादातून अंकुश शांताराम सावंत (५७, रा. तळवडे बादेवाडी) यांच्यावर कोयत्याने हल्ला करण्यात आला आहे. याप्रकरणी त्यांचा मुलगा अनिल अंकुश सावंत (२५) यांनी संबंधितांच्या विरोधात सावंतवाडी पोलिसांत दिलेल्या तक्रारीनुसार संतोष निळकंठ सावंत (४३, रा. तळवडे बादेवाडी ) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबतचा अधिक तपास सावंतवाडी पोलीस करीत आहेत.
याबाबत अनिल सावंत यांनी दिलेल्या तक्रारीत असे म्हटले आहे की अंकुश सावंत हे तळवडे बादेवाडी येथील डांबरी रस्त्याचे साईडला असलेल्या झाडाच्या फांद्या रस्त्यावर आल्याने त्या तोडत होते. यावेळी संतोष सावंत यांनी त्यांच्या शेतामध्ये तोडून टाकलेले झाड त्यांनीच तोडून टाकले आहे असा गैरसमज केला आणि त्या गोष्टीचा मनात राग धरून हातात कोयता घेऊन पाठीमागून येऊन शिवीगाळ करत त्यांच्या डाव्या हाताच्या कोपरावर कोयत्याने हल्ला केला. तसेच त्यांना ठार मारण्याची धमकी दिली.
त्यानंतर जखमी सावंत यांना त्यांच्या चुलत भावाने येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. त्यानंतर त्यांना पुढील उपचारासाठी गोवा बांबुळे येथे हलविण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
अनिल सावंत यांनी दिलेल्या तक्रारीनुसार येथील पोलीस ठाण्यात भादवि कलम ३२४,५०४ व ५०६ अन्वये संशयित संतोष सावंत याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबतचा अधिक तपास सावंतवाडी पोलीस करीत आहेत.
दरम्यान, संतोष सावंत यांनी अनिल सावंत यांच्या विरोधात परस्पर विरोधी तक्रार दिली असून त्यानुसार येथील पोलीस ठाण्यात त्याच्या विरोधात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे.