दापोली | प्रतिनिधी:- तालुक्यामध्ये वर्षभरात अर्थात एप्रिल २०२२ ते मार्च २०२३ या कालवधीत सर्प, विंचू, श्वान दंश झालेल्या १ हजार ९ रूग्णांनी उपचार घेतल्याचे उपजिल्हा रूग्णालयाकडून समोर आले आहे. मात्र यामध्ये मृत्यूदर शून्य असल्याने ही दिलासादायक बाब ठरली आहे. खेड्यात अनेक ग्रामस्थ जावून लाकडे जमा करणे, गवत काढणे अशी कामे करत असतात. अशी कामे करत असताना पालापाचोळ्यात दडलेले हे साप व विंचू त्या व्यक्तीला दंश करतात. तसेच दापोली शहर, ग्रामीण भागांमध्ये भरदिवसा भटक्या कुत्र्यांची फौजच फिरत असते. त्यात पिसाळलेले कुत्रेदेखील असतात. त्यामुळे अनेक भटके कुत्रे अंगावर धावून जातात आणि दंश करतात. एप्रिल २०२२ ते मार्च २०२३ या कालावधीत दापोली उपजिल्हा रूग्णालयात साप चावलेले ३४० रूग्ण विंचू दंश १६०, तर श्वान दंश ५०९ असे एकूण १ हजार ९ रूग्ण उपचारासाठी दाखल झाले होते. दाखल झालेल्या सर्व रूग्णांवर उपजिल्हा रूग्णालयात यशस्वी उपचार करण्यात आले