“सदैव बहरलेला “मधुमास”

कोमसाप मालवणचा गझलकार स्व. मधुसूदन नानिवडेकर यांच्या द्वितीय स्मृतिदिनी अक्षरोत्सव.

आचरा | अर्जुन बापर्डेकर : मधुसूदन नानिवडेकर हे आभाळ उंचीचे गझल क्षेत्रातील व्यक्तिमत्व आम्हा सर्वांसाठी अक्षरशः दवबिंदू होऊन वावरत होते, ही काही वर्षांनी कोणालाही आख्यायिका वाटेल! “प्रौढत्वी निज शैशवास जपणे” हे ब्रीदवाक्य गझलकार नानिवडेकर खऱ्या अर्थाने जगले होते. त्यांचा स्मृतीदरवळ पौर्णिमेच्या टिप्पूर चांदण्याप्रमाणे गझलांचा सहवास देत राहील,” असे उद्गार सुरेश शामराव ठाकूर, (अध्यक्ष कोकण मराठी साहित्य परिषद, शाखा मालवण) यांनी कोमसाप मालवणच्या “सदैव बहरलेला मधुमास” या कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी काढले. कोमसाप मालवणच्या 50 नानिवडेकर प्रेमींनी कोमसाप मालवण ग्रुप वर ऑनलाईन सोहळा आयोजित केला होता. मुंबईपासून गोव्यापर्यंत आणि पुणे पासून ठाणे पर्यंत सर्व नानिवडेकर रसिक त्यात सहभागी झाले होते. सिंधुदुर्गवासिय नानिवडेकर प्रेमींचा भरणा त्यात जास्त होता. यावर्षीचा मधूसुदन नानिवडेकर साहित्य पुरस्कार ज्यांना लाभला त्या श्रीम. अंजली मुतालिक ह्या अक्षर सोहळ्याच्या प्रमुख अतिथी होत्या. आपल्या भाषणात त्या म्हणाल्या, “माझ्यासारख्या कवी मनाचा विकास करण्यात मधुसूदन नानेवडेकरांचा वाटा फार मोठा आहे. अगदी सहजतेने त्यांनी मला प्रभावी कसे लिहावे यांचे मार्गदर्शन केले.”

यावेळी दौलतराव राणे, माधव गावकर, रुजारीओ पिंटो, सदानंद कांबळी, अनिल रेडकर, मंदार सांबारी, मधुरा माणगावकर, नारायण धुरी, विजयकुमार शिंदे, सुरेंद्र सपकाळ, एकनाथ गायकवाड, रसिका तेंडोलकर, सुजाता टिकले, चेतन बोडेकर, विठ्ठल लाकम, रामचंद्र कुबल, अनिरुद्ध आचरेकर, श्रावणी प्रभू, भानू तळगावकर यांनी काव्यरचनातून, तर वैजयंती करंदीकर, वर्षाराणी अभ्यंकर, शरयू हिर्लेकर, विनिता कांबळी, मधुरा माणगावकर, विजयकुमार शिंदे, अनघा नेरुरकर, अजय मुणगेकर, अशोक कांबळी, गुरुनाथ ताम्हणकर, एकनाथ गायकवाड, भानू तळगावकर, रवी पाटील, उज्वला सामंत, रामचंद्र आंगणे, दत्तात्रय मुळीक, अनिल रेडकर यांनी आठवणीच्या लेखातून, दत्तात्रय हिर्लेकर गुरुजी यांनी कात्रण संग्रहातून, मंदार सांबारी, उज्ज्वला धानजी यांनी काव्यवाचनातून तर अनिल कुबल यांनी रंगरेषातून मधुसूदन नानिवडेकर यांना अक्षरांजली अर्पण केली. सर्वांचे आभार गुरुनाथ ताम्हणकर (उपाध्यक्ष कोमसाप मालवण) यांनी मानले.