स्वाभिमान रिक्षा चालक-मालक संघटना रत्नागिरी जिल्हाध्यक्ष श्री अशोक वाडेकर यांची पोलीस अधीक्षकांकडे पत्राद्वारे मागणी
रत्नागिरी : स्वाभिमान रिक्षा चालक-मालक संघटना पदाधिकारी व व्यवसायिक यांची एकत्रित बैठक जिल्हाध्यक्ष श्री अशोक वाडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाली.या बैठकीत रिक्षा व्यवसायिकांवर पोलिसांकडून होणारी अनधिकृतपणे कारवाई यावर सविस्तर चर्चा करण्यात आली.या बैठकीला जिल्हा उपाध्यक्ष श्री सुहास लिंगायत,तालुकाध्यक्ष श्री अमर पाटील,शहराध्यक्ष श्री इम्रान नेवरेकर,श्री महेंद्र शिंदे,श्री सचिन रांबाडे,श्री वैभव बेंद्रे,श्री अभिजित सागवेकर, श्री रमण पुरी,श्री नितिन चेचरे,श्री अनिस बगदादी, श्री अमोल शिंदे,श्री मंदाले,श्री नवनाथ कुड,श्री मनोज जाधव आदी पदाधिकारी व रिक्षा व्यवसायिक उपस्थित होते.
दिवसेंदिवस बेरोजगारी वाढत असल्यामुळे रोजगारासाठी तरुण वर्ग रिक्षा व्यवसाय करीत आहे.मात्र यामध्ये रिक्षा संख्येच्या मनाने रिक्षा अधिकृत थांबे कमी पैशात शेअर स्वरूपात वाहतूक करणारे रिक्षा व्यवसायिक यांची फार मोठी विवंचना सुरू आहे.
सर्व कायदेशीर कागदपत्र पूर्ण असतानाही रिक्षा व्यवसायिकांना शेअरिंग भाडे व्यवसाय करताना वाहतूक पोलीस व इतर संबंधित यंत्रणेकडून हकनाक मानसिक त्रास सोसावा लागत आहे.विशेषतः वाहतूक पोलीस यंत्रणेतील काही ठराविक पोलीस रिक्षा व्यवसायिकांना त्रास देत असल्याचे रिक्षा व्यवसायिकांचे म्हणणे आहे.
याची सत्यासत्यता पडताळणी होऊन हातावर पोट असणाऱ्या रिक्षा व्यवसायिकांना न्याय मिळावा.तसेच वाहतूक नियंत्रण समिती अंमलबजावणी तात्काळ करण्यात यावी.अशी मागणी स्वाभिमान रिक्षा चालक-मालक संघटनेचे रत्नागिरी जिल्हाध्यक्ष श्री अशोक वाडेकर यांनी पत्राद्वारे पोलीस अधीक्षक यांच्याकडे केली आहे.