प्रेक्षकच निर्माता बनू पहाणारे नाटक ‘नात्याची गोष्ट’

एकदा तरी पाहिलच पाहिजे…!

संतोष वायंगणकर : नाटक चालत कशामुळे? तर त्या नाटकात ग्लॅमर असलेले अभिनेता, अभिनेत्री असेल तरच…. ; असा एक गैरसमज असल्याने एखादी तगडी नाट्य संहिता असली, तरीही त्या नाटकाला निर्माताच मिळत नाही. मग त्यातूनच प्रेक्षकांनाच निर्माता बनवुन नाट्यप्रयोग करण्याचा प्रयत्न होतो. या अशा नव्या वाटेने जात सध्या मुंबईत ‘नात्याची गोष्ट’ हे नाटक प्रेक्षकांकडून केवळ एक रूपया स्वागत मूल्य घेऊन सादर केलं जात आहे.

नात्याची गोष्ट नाटकाला प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. ” या नाटकाचे महाराष्ट्रभर नाट्यप्रयोग करण्याचा आमचा प्रयत्न आहे. फक्त प्रेक्षकांनी साथ द्यायला हवी” असे मत नात्याची गोष्ट या नाटकाचे व्यवस्थापक अनिकेत शहाणे आणि अव्दैत चव्हाण यांनी दै.प्रहार आणि प्रहार डिजिटलशी बोलताना व्यक्त केले.
एक रूपया नाममात्र मूल्य घेऊन नाटकांचे प्रयोग करणे याची कल्पनाही कोणी करू शकत नाही. मात्र, नात्याची गोष्ट या नाटकाला कोणी निर्माता मिळत नाही म्हणून या नाटकात काम करणाऱ्या कलाकारांनीच ठरवल प्रेक्षकांना साद घालून पाहूया ! आणि त्याला प्रतिसादही मिळाला. नात्याची गोष्ट या नाटकाविषयी आणि एक रूपया घेऊन नाटक दाखवल जात. हे समजल्यावर या वेगळ्या वाटेवरच्या प्रयोगाविषयी जाणून घेण्यासाठी नाटकाचे व्यवस्थापक अनिकेत शहाणे आणि अव्दैत चव्हाण यांच्याशी मोबाईलवर संपर्क केल्यावर अनिकेत आणि अव्दैत या दोघांनीही नात्याची गोष्ट या नाटकाविषयी सांगितलं ते म्हणाले “गेल्या वर्षी आम्ही हे नाटक राज्य नाट्य स्पर्धेत उतरवल. या नाटकाला तीसरं पारितोषिक मिळाल.
हौशी नाट्य स्पर्धेसाठी म्हणून आमच्या ग्रृपने हे नाटक बसवल होतं. दिग्दर्शनाच्या पारितोषिकासह अभिनयाची पारितोषिकेही मिळाली आणि विशेष म्हणजे नाटकाच्या सेटलाही द्वितीय पारितोषिक मिळाले .”

प्रेक्षकांनाच निर्माता म्हणण्याच कस सूचल असं विचारताच अनिकेत आणि अव्दैत या दोघांनीही एका सूरात सांगितलं जेव्हा या नाटकाचे व्यावसायीक रंगमंचावर प्रयोग व्हावेत यासाठी आम्ही प्रयत्न सुरू केले. परंतु निर्मात्यांनी मूळ नाट्य संहितेत काही बदल करण्याविषयी सूचवले. तर काहींनी या नाटकात ग्लॅमर असलेला कलाकार घ्यावा लागेल तरच नाटक चालेल असे सांगण्याचा प्रयत्न केला. खरंतर हा विषयच पूर्णपणे वेगळा आहे-या नाटकाचा हिरो आहे. आजपर्यंत घटस्फोट झालेल्या दांपत्यां विषयी विविध कलाकृती झाल्या आहेत ,परंतु त्या घटस्फोटामुळे मुलांच्या भावविश्वा वर होणार्या आघाताविषयी कलाकृती आलेल्या नाहीत. या भावनांच्या कल्लोळात रसिक प्रेक्षक कधी समरसून जातात हेच रसिकांना समजून येत नाही. ही बाब राज्य नाट्य स्पर्धेतील प्रयोगावेळीच समजून आली होती. यामुळेच आम्ही कोणत्याही स्थितीत हे नाटक लोकांसमोर न्यायचंच असं ठरवल आणि तसे प्रयत्न केले जात असल्याचं त्यांनी सांगितले.
प्रेक्षकांचा कसा प्रतिसाद मिळतोय असं विचारताच अव्दैत यांनी सांगितले- आत्तापर्यंत आम्ही सर्व संघाने मिळून 32 प्रयोग करण्यात यशस्वी झालेलो आहोत. नुकतेच ठाणे गडकरीला दोन प्रयोग झालेत. तिसराही प्रयोग आहे. नाशिक, आणि मुंबईतही प्रयोग आहेत. प्रेक्षकांचा प्रतिसाद तर चांगला मिळत आहे. परंतु शेवटी प्रयोग होत रहाण्यासाठी पैसे तर लागणारच आहेत. प्रेक्षकांनी यावं नाटक पहावं. आणि जर नाटक मनापासून आवडलं तर त्याच स्वेच्छामुल्य त्यांनी द्याव. असं अव्दैत चव्हाण आणि अनिकेत शहाणे यांनी सांगितलय.
या नात्याची गोष्ट नाटकात दिपाली शहाणे, अव्दैत चव्हाण, अधिराज कुरणे, धनश्री साटम, अनघा प्रियोळकर, अक्षय नवाथे, अभिराज भोसले आणि या नाटकाचे दिग्दर्शक निलेश गोपनारायण हे या नाटकात प्रमुख भुमिकेत आहेत. मुंबईत तर नात्याची गोष्टीचे प्रयोग होत आहेतच. या नाटकाचे महाराष्ट्राभरही प्रयोग होतील. याचे कारण या नाटकाचा निर्माता हा प्रेक्षकच आहेत.