विशेष पथक पाठवून सर्वेक्षण करण्याची जिल्हाधिकाऱ्यांची ग्वाही
राजापूर | प्रतिनिधी : शासनाच्या जलसंपदा विभागाने राजापूर शहरात नव्याने लादलेल्या पुररेषेमुळे नागरिक, व्यापारी यांना कोणत्याही प्रकारचे बांधकाम करणे अशक्य झालेले आहे. त्यामुळे ही जाचक पुररेषा रद्द करून राजापुरात पुररेषेचे नव्याने सर्वेक्षण करावी अशी मागणी सोमवारी राजापूर तालुका भाजपाच्या वतीने माजी खासदार निलेश राणे यांच्याकडे करण्यात आली. यावर निलेश राणे यांनी जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह यांच्याशी दुरध्वनीद्वारे संपर्क साधून याबाबत आपण जातीनिशी लक्ष घालून राजापूर शहरातील पुररेषेचे पुर्नसर्वेक्षण करावे अशी मागणी केली. यावर जिल्हाधिकारी यांनी याची तातडीने दखल घेत यासाठी एक विषेश पथक पाठवून आपण योग्य ती कार्यवाही करू अशी ग्वाही निलेश राणे यांना दिली. तशी माहिती राणे यांनी पत्रकारांना दिली.
माजी खासदार निलेश राणे सोमवारी राजापूर तालुका दौऱ्यावर आले होते. याप्रसंगी शासकिय विश्रामगृहावर त्यांनी भाजपा पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी चर्चा केली.
यावेळी भाजपा तालुका अध्यक्ष अभिजित गुरव यांनी राजापूर शहरात जलसंपदा विभागाने नव्याने लादलेल्या पुररेषेमुळे शहराच्या विकासाला खिळ बसणार असून ही पुररेषा अगदी राजापूर नगर वाचनालयापर्यंत आणण्यात आल्याने अनेक नागरिक, व्यापारी यांना आपली घरे, दुकाने दुरूस्त करणे वा नव्याने बांधणे यासाठी परवानगी मिळणे मुश्कील झाल्याचे नमुद केले. यामुळे शहराच्या विकासालाही खिळ बसणार असल्याचे गुरव व उपस्थित भाजपा पदाधिकाऱ्यांनी सांगितले. तर या पुररेषेचे नव्याने सर्वेक्षण करण्यात यावे अशी मागणी केली.
तात्काळ याची दखल घेत निलेश राणे यांनी जिल्हाधिकारी देवेंदर सिंह यांच्याशी संपर्क साधला व राजापूरातील पुररेषेबाबत स्थानिकांच्या असलेल्या तक्रारींची माहीती दिली. यावेळी राणे यांनी अशा प्रकारे जर का ही पुररेषा जाचक ठरणार असेल तर त्याचे नव्याने सर्वेक्षण करावे अशी मागणी यावेळी केली. यावर जिल्हाधिकारी देवेंदर सिंह यांनी याबाबत योग्य ती कार्यवाही करण्याची ग्वाही राणे यांना दिली. यासाठी एक विशेष पथक पाठवून पुन्हा नव्याने सर्वेक्षण करण्याबाबत कार्यवाही करण्याची ग्वाही जिल्हाधिकारी यांनी राणे यांना दिली.
याप्रसंगी राणे यांनी भाजपा पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी राजापूर व लांजा तालुक्यातील विविध प्रश्नांबाबत चर्चा केली.
याप्रसंगी भाजपा जिल्हा उपाध्यक्ष रवींद्र नागरेकर, महिला प्रदेश सचिव सौ. शील्पा मराठे, भाजपा सहकार सेलचे जिल्हाध्यक्ष अनिलकुमार करंगुटकर, तालुका अध्यक्ष अभिजित गुरव, लांजा तालुका अध्यक्ष महेश उर्फ मुन्ना खामकर आदींसह भाजपा पदाधिकारी उपस्थित होते.