पुण्यश्लोक बापूसाहेब महाराज व श्रीमंत शिवरामराजेंच्या पुतळ्यांची लवकरच डागडुजी

Google search engine
Google search engine

नगरपालिका प्रशासनाचे ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अनिल परुळेकर यांना आश्वासन

परुळेकर यांच्यासह रवी जाधव यांनी भेट घेत व्यक्त केली होती नाराजी

सावंतवाडी । प्रतिनिधी : संस्थानकालीन सावंतवाडी शहराचे आदरस्थान असलेल्या पुण्यश्लोक बापूसाहेब महाराज व शिवरामराजे भोसले यांच्या शहरात स्थापन करण्यात आलेल्या आलेल्या पुतळ्यांची सद्यस्थितीत डागडुजी अभावी अत्यंत दुरावस्था झाली आहे. याकडे सामाजिक कार्यकर्ते अनिल परुळेकर व रवी जाधव यांनी पालिका प्रशासनाचे लक्ष वेधले.यावेळी लवकरच याबाबत तज्ञांकडून मार्गदर्शन घेत त्वरित त्याची डागडुजी करण्यात येईल, असे आश्वासन पालिकेचे मुख्याधिकारी जयंत जावडेकर यांनी दिले.

सावंतवाडी संस्थानचे पुण्यश्लोक बापूसाहेब महाराज यांनी सावंतवाडी शहरातील प्रजेच्या हितासाठी अनेक गोष्टी केल्या. त्यामध्ये प्रामुख्याने स्त्रियांच्या प्रस्तुतीसाठी राणी जानकीबाई सुतिका गृह रुग्णालयाची स्थापना केली, प्रजेला उच्च शिक्षण मिळावं यासाठी सहा प्राथमिक शाळा व श्री पंचम खेमराज महाविद्यालयाची स्थापना केली. पूर्वी घोड्याच्या पागेच असलेलं ठिकाण आताचं सावंतवाडी एसटी स्टँड ची जागा संस्थानाने जनतेच्या सेवेला दिली. सकाळ व सायंकाळी मुलं ज्या गार्डनमध्ये खेळतात ती जागा संस्थानाने नगर परिषदेला उद्यानासाठी दिली, तर उभा बाजार येथील रघुनाथ मार्केटची जागा ही त्यांनी नगरपालिकेला दिली. सावंतवाडी शहराचे निसर्गरम्य मोती तलावाची प्रॉपर्टी सुद्धा संस्थानाची आहे.

अशा कित्येक गोष्टी संस्थानाने या शहरासाठी दिल्या.

त्यामुळेच त्यांच्या अविस्मरणीय कर्तुत्वाची ओळख प्रत्येकाला व्हावी म्हणून तत्कालीन सत्ताधार्‍यांनीनी शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी तलावाच्या काठी पुण्यश्लोक बापूसाहेब महाराज व श्रीमंत शिवराम राजे भोसले यांचे भव्य पुतळे उभारण्यात आले. सदरचे पुतळे शहरवासीयांसाठी स्फूर्ती व आकर्षणाचा भाग बनले आहेत.

परंतु सद्यस्थितीत या पुतळ्यांची अत्यंत दुरावस्था झालेली आहे. त्यामुळे स्थानिक नागरिकांबरोबरच पर्यटकांमध्ये सुद्धा नाराजी व्यक्त केली जात आहे. या संदर्भात सावंतवाडीचे माजी नगराध्यक्ष कै. भाऊसाहेब परुळेकर यांचे ज्येष्ठ पुत्र अनिल परुळेकर यांनी मुख्याधिकारी जावडेकर यांची भेट पुण्यश्लोक बापूसाहेब महाराज व श्रीमंत शिवराम राजे भोसले यांच्या पुतळ्यांच्या दुरावस्थेबाबत आपली व्यथा मांडली.

त्यानंतर मोती तलावाच्या काठी बसवलेल्या पुतळ्यांच्या डागडुजी व इतर त्या आजूबाजूच्या रंगरंगोटी संदर्भात जावडेकर व परुळेकर यांच्यामध्ये सकारात्मक चर्चा झाली. सदर पुतळा पंचधातूचा असल्याकारणाने त्यावर पेंटिंग करता येणार नसल्याने याबाबत तज्ञांकडून माहिती घेऊन लवकरात लवकर डागडूजीचे काम करण्यात येईल अशी ग्वाही मुख्याधिकारी जावडेकर यांनी अनिल परुळेकर यांना दिली.

यावेळी नगरपरिषदेचे अभियंता शिवप्रसाद कुडपकर व सामाजिक कार्यकर्ते रवी जाधव उपस्थित होते. याबाबतची माहिती रवी जाधव यांनी दिली आहे.

Sindhudurg