स्थानिक नागरिकांची पालिका प्रशासनाकडे मागणी
सावंतवाडी । प्रतिनिधी :
सावंतवाडी शहरातील जुनाबाजार येथील कै. सुधाताई कामत जि. प. शाळा क्र. २ समोरील सावंतवाडी नगर परिषदेच्या मालकीच्या असलेल्या जागेतील काही वृक्ष पावसाळयात वीज पडून पुर्ण वठले आहेत. तसेच इतर वृक्ष हे रस्ता व महावितरणच्या मुख्य वाहिनीवर धोकादायकरित्या कलंडलेले आहेत. हे वृक्ष धोकादायक बनले असून ते तातडीने तोडण्याची आवश्यकता आहे.
तसेच हे वृक्ष ज्या ठिकाणी आहेत तेथील संरक्षक भिंतीचा म्हणजेच गडग्याचा काही भाग दोन वर्षापुर्वी कोसळला आहे. त्यामूळे त्यापुढील गडगा ही जीर्ण होत असुन केव्हाही कोसळण्याची शक्यता आहे. तरी सदर ठिकाणी शाळा असल्याने विदयार्थ्यांचा व त्या परिसरातील नागरिकांचा येण्या-जाण्याचा तोच मुख्य मार्ग असल्याने पालिका प्रशासनाने याची गांभिर्याने दखल घेऊन तातडीने या भागाची पाहणी करून धोकादायक वृक्षांची तोडणी व जीर्ण गडग्याची लवकरात लवकर दुरूस्ती करावी, अशी मागणी किशोर चिटणीस व अन्य नागरिकांनी पालिका प्रशासनाकडे केली आहे. यावेळी संदीप धुरी, अभिजीत कामत, गुरुप्रसाद चिटणीस व राधाकृष्ण केळुसकर आदी उपस्थित होते.
Sindhudurg