भगवंतगड कॉजवे पाण्याखाली ; वाहतूक बंद

मसुरे| झुंजार पेडणेकर

गेले चार दिवस अविश्रांत बसणाऱ्या पावसाने मसुरे सह पंचक्रोशीतील भातशेती पाण्याखाली गेली आहे. गडनदीचे पात्र सुद्धा धोक्याची पातळी ओलांडून दुथडी भरून वाहत आहे. बांदिवडे ते आचरा जोडणारा भगवंतगड कॉजवे सलग दुसऱ्या दिवशी पाण्याखाली गेला होता. तसेच बांदिवडे त्रिंबक मार्गावर सुद्धा पाणी आल्याने या ठिकाणची वाहतूक विस्कळीत झाली होती. मसुरे बांदिवडे येथून आचरे येथे जाण्यासाठी भगवंतगड वरून जावे लागते. गडनदीच्या पाण्याची पातळी गुरुवारी दुपारनंतर पुन्हा वाढल्याने हा कॉजवे पाण्याखाली गेला होता. त्यामुळे येथून होणारी वाहतूक बंद आहे. तसेच भगवंतगड येथून बांदिवडे येथे शेतीसाठी येणाऱ्या शेतकऱ्यांची सुद्धा यामुळे गैरसोय झाली. पावसाचा जोर सायंकाळ नंतर सुद्धा असाच राहिलास गडनदी पात्राबाहेर वाहण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.