मत्स्य व्यवसायिक विली डिसोजा, विकी चोपडेकर व सहकाऱ्यांनी दिली माहिती
मालवण | प्रतिनिधी : मालवण शहरातील दांडी मासळी लिलाव या ठिकाणी असलेला हायमास्ट टॉवर गेले वर्षभर बंद होता. स्थानिक लोकप्रतिनिधी यांनी याकडे दुर्लक्ष केले. मात्र माजी नगराध्यक्ष सुदेश आचरेकर व माजी नगरसेवक दीपक पाटकर यांना याबाबत माहिती दिल्यानंतर त्यांनी आपल्या स्तरावरून तसेच प्रशासन स्तरावरून योग्य ती कार्यवाही पूर्ण करून बंद हायमास्टची दुरुस्ती तात्काळ करून घेत हायमास्ट टॉवर प्रकाशमान केला आहे. अशी माहिती मत्स्य व्यवसायिक विली डिसोजा, विकी चोपडेकर यांनी दिली आहे.
दरम्यान, हायमास्ट दुरुस्ती ज्यांना शक्य झाली नाही त्या एका माजी लोकप्रतिनिधी यांनी हायमास्ट काम सुरू असताना खिल्ली उडवण्याचे काम मात्र केले. असा आरोपही विली डिसोजा यांनी केला.मालवण भाजप कार्यालय येथे बुधवारी डीसोजा व चोपडेकर यांनी सुदेश आचरेकर व दीपक पाटकर यांचे आभार मानले. यावेळी माजी उपसभापती राजू परुळेकर, मोहन वराडकर आदी उपस्थित होते.
यावेळी आचरेकर म्हणाले, आम्ही जनसेवक आहोत. नागरिकांची कामे पूर्ण करणे हे प्रत्येक जनसेवकाचे काम आहे. मात्र काही जण केवळ फुकाचेच श्रेय घेण्यात धन्यता मानतात. दुसऱ्यांनी केलेल्या कामांचे श्रेय घेतात. तेव्हा त्यांची कीव येते.येथील मच्छमार, महिला मच्छिमार, मत्स्य विक्रेते, मत्स्य एजंट यांना बंद हायमास्ट अभावी निर्माण होणाऱ्या समस्यांकडे येथील स्थानिक नगरसेवक यांनी दुर्लक्ष केले. अखेर या प्रश्नी विली डिसोजा, विकी चोपडेकर व अन्य मत्स्य विक्रेते मच्छिमार यांनी लीलाधर पराडकर यांच्या माध्यमातून माझे व दीपक पाटकर यांचे लक्ष वेधले. त्यांनंतर हायमास्ट दुरुस्ती प्रक्रिया पूर्ण करून घेत हायमास्ट चालू करून दिला. मात्र याचे श्रेय अन्य काहीजण घेत असल्याने सांगत सुदेश आचरेकर यांनी आपल्या शैलीत त्यांचा समाचार घेतला.हायमास्ट टॉवरच्या दुरुस्ती कामाचे फुकाचे श्रेय कोणी घेऊ नये. मच्छिमारांची दिशाभूल थांबवावी. अन्यथा तोंडघशी पडण्याची वेळ येईल. अशी भूमिका आचरेकर यांनी मांडली आहे.