पत्रकार सिद्धेश मराठे यांच्यावर शिवणे खुर्द गावात हल्ला

गुरुवारी सायंकाळी ७:३० च्या सुमारास अंधाराचा फायदा घेऊन तीन चार इसमांनी केला हा हल्ला

रत्नागिरी :
राजापूर तालुक्यातील शिवणे खुर्द येथील पत्रकार, शेतकरी, काँग्रेस कार्यकर्ते सिद्धेश मराठे यांच्यावर हल्ला झाल्याची घटना घडली आहे. गुरुवारी २५ डिसेंबर रोजी सायंकाळी ७:३० वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. याप्रकरणी सिद्धेश मराठे यांनी राजापूर पोलिसात तक्रार दिली आहे. पोलिसांनी अज्ञातांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

सिद्धेश मराठे शिवणे खुर्द गावात सायंकाळी गेले. घरी परतत असताना भट वाडी स्टॉप वर दोन गाड्या त्याच्यामध्ये एक पांढऱ्या रंगाची कार आणि थार गाडी अशा दोन गाड्या पाठलाग करत आल्या. त्यावेळी तीन चार अज्ञात इसमांनी मास्क लावून सिद्धेश मराठे यांच्या ऍक्टिव्हा गाडीची चावी खेचून त्यांना मारण्यास सुरुवात केली. सायंकाळी त्या ठिकाणी अंधार निर्माण झालेला होता. आणि अंधाराचाच फायदा त्यांनी घेतला.

सिद्धेश मराठे यांना या तीन चार इसमांनी फटके मारून त्यांच्या गाडीची चावी कुठेतरी फेकून देऊन हे इसम देवाचे गोठणेच्या दिशेने पळून गेले. त्यानंतर सिद्धेश मराठे भट वाडी स्टॉप पासून काही अंतरावरच असलेल्या आपल्या घरी कसेबसे पोचले.

त्यानंतर राजापूर पोलिस निरीक्षक अमित यादव रात्रीच घटनास्थळी पोचले. यावेळी त्यांच्यासोबत शिवणे खुर्द गावचे पोलिस पाटील आणि तंटा मुक्त समितीचे अध्यक्ष देखील उपस्थित होते. त्यानंतर उशिरा राजापूर पोलिस ठाणे येथे सिद्धेश मराठे यांनी दिलेल्या फिर्यानुसार गुन्हा नोंद करण्यात आला आहे.