आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून हवामानातील बदल ओळखूनच शेतकरी यांनी उत्पादन वाढविण्याची गरज: कुलगुरू डॉ. संजय सावंत

Google search engine
Google search engine

दोडामार्ग | सुहास देसाई : वाढते शहरीकरण व बदलते हवामान हा प्रश्न आताच निर्माण झालेला नसून हवामान बदल काही कालावधीनंतर होत आलेला आहे. हवामान बदलाचा दिवसेंदिवस शेती उत्पादनावर विपरीत परिणाम होताना दिसून येत आहे. असे असले तरी या बदलाला सामोरे जाण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून भविष्यात शेतकरी यांनी आपल्या शेतातील उत्पादन वाढविणे गरजेचे आहे असे प्रतिपादन डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. संजय सावंत यांनी केले.

दोडामार्ग येथे नवनिर्माण शिक्षण संस्थेच्या हळबे महाविद्यालयात आयोजित केलेल्या अर्थशास्त्र विभागाच्यावतीने आयसीएसएसआर मुंबई पुरस्कृत “हवामान बदल आणि भारतीय शेती” या विषयावर आंतरविद्या दोन दिवसीय चर्चासत्र संपन्न झाले. त्यावेळी ते बोलत होते. चर्चासत्राची सुरवात दिपप्रज्वलनाने करण्यात आली. यावेळी व्यासपीठावर डॉ. बाळासाहेब कोंकण कृषी विद्यापीठाचे संशोधक संचालक डॉ. संजय भावे, नवनिर्माण शिक्षण संस्था रत्नागिरीचे संचालक सूर्यकांत परमेकर, आत्मा समितीचे दोडामार्ग तालुकाध्यक्ष प्रेमानंद देसाई,  महाविद्यालय विकास समितीचे सदस्य विवेकानंद नाईक, प्रा. राजेंद्र केरकर, प्राचार्य डॉ. सुभाष सावंत, प्रा. डॉ. एस. यु. दरेकर उपस्थित होते.

यावेळी डॉ.सावंत मार्गदर्शन करताना म्हणाले की, शेतीचे उत्पादन वाढविण्यासाठी विद्यापीठ व देशपातळीवर संशोधन होत आहे. त्याचा सर्व शेतकऱ्यांनी लाभ घेणे गरजेचे आहे. कोंकण प्रदेश हा सद्यस्थितीत हवामान बदलापासून काही प्रमाणात सुरक्षित असला तरी भविष्यात ही समस्या वाढण्याचा धोका नाकारता येणार नाही. त्यासाठी शेतकऱ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून उत्पादन वाढविणे गरजेचेअसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले .

 

शेतीला उद्योगाची जोड देण्यासाठी दृष्टिकोन बदलणे गरजेचे : डॉ. संजय भावे

डॉ. बाळासाहेब सावंत कोंकण कृषी विद्यापीठाचे संशोधन संचालक डॉ. संजय भावे यांनी सांगितले की आपला शेतीकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलणे गरजेचे आहे. शेतीला जर आपण इतर उद्योगाची जोड दिल्यास व पूर्णवेळ शेती केल्यास त्याचा फायदा निश्चितच शेतकऱ्यांना होईल, असे मत त्यांनी व्यक्त केले. जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते, उद्योजक तथा महाविद्यालय विकास समितीचे सदस्य विवेकानंद नाईक यांनी महाविद्यालयात होणाऱ्या सांस्कृतिक विविध उपक्रमासाठी स्टेज तयार करून दिल्याबद्दल त्यांचा कुलगुरूंच्या हस्ते शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे  प्रास्ताविक डॉ. एस. यु. दरेकर यांनी केले. सूत्रसंचालन डॉ. संजय खडपकर, तर आभार डॉ. सोपान जाधव यांनी मानले. या समारंभासाठी डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोलीचे संशोधक सहायक डॉ. कस्तुरे, वेगवेळ्या महाविद्यालयाचे प्रतिनिधी, तालुका कृषी अधिकारी प्रमोद बनकर महाविद्यालायातील सर्व प्राध्यापक, कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते.