‘करवंटी वस्तू’ दालनला केळकर महाविद्यालय देवगडच्या विद्यार्थ्यांची इंडस्ट्रीयल व्हिजिट

मालवण मेढा येथे भूषण मेतर यांचे करवंटी वस्तूंचे दालन ; विद्यार्थ्यांनी भेट देत घेतली माहिती

मालवण | प्रतिनिधी : देवगड येथील स. ह. केळकर महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी इंडस्ट्रीयल व्हिजिट उपक्रमांतर्गत मालवण मेढा येथील भूषण मेतर यांच्या निवासस्थानी नारळाच्या करवंटी पासून बनविलेल्या वस्तू दालनला भेट देत माहिती घेतली. मालवण येथील पत्रकार तथा एक गुणवंत कलाकार भूषण मेतर हे आपल्या निवासस्थानी नारळाच्या करवंटीपासून विविध आकर्षक व नाविन्यपूर्ण वस्तू बनवतात. यात शोभिवंत तसेच वापरायोग्य वस्तूंचा समावेश आहे.

देवगड येथील केळकर महाविद्यालयाच्या बँकिंग इन्शुरन्स शाखेच्या ४० विद्यार्थ्यांनी आपल्या इंडस्ट्रीयल व्हिजिट सहल दरम्यान श्रीधर काळे यांच्या माध्यमातून भूषण मेतर यांच्या घरी भेट देऊन करवंटी वस्तूंबाबत व्यवसायिक दृष्टिकोनातून माहिती घेतली. यावेळी विद्यार्थ्यांसमवेत महाविद्यालयाच्या प्रा. सौ. रश्मी हिर्लेकर, प्रा. शामली तारी उपस्थित होत्या.यावेळी भूषण मेतर यांनी ‘टाकाऊ पासून टिकाऊ’ या धर्तीवर बनविण्यात येणाऱ्या करवंटी वस्तूंबाबत माहिती दिली. करवंटी पासून आकर्षक वस्तू कशा बनवितात, त्यात आवश्यक असणारी कल्पकता तसेच त्यातील व्यावसायिक संधी याबाबतही मेतर यांनी विद्यार्थ्यांना माहिती दिली. सर्वांनीच भूषण मेतर यांच्या करवंटी वस्तूंचे विशेष कौतुक केले.