सेवानिवृत्त प्राथमिक शिक्षक असोसिएशनने केली आश्वासनपूर्ती
कणकवली I मयुर ठाकूर : कणकवली तालुका सेवानिवृत्त प्राथमिक शिक्षक असोसिएशनच्यावतीने कणकवली पंचायत समिती शिक्षण विभागाला दोन स्टील कपाटे भेट देण्यात आली. पंचायत समितीच्यावतीने गटविकास अधिकारी अरुण चव्हाण यांनी त्यांचा स्विकार करुन सेवानिवृत्त शिक्षकांच्या या सेवाभावी उपक्रमाचे कौतुक करुन धन्यवाद दिले.
गत तालुका पेन्शन अदालतीमध्ये पेन्शनसंबंधी विविध प्रश्नांचा उहापोह होत असताना शिक्षकांच्या सेवापुस्तिकांच्या सुरक्षित जतनाचा प्रश्न चर्चेला आला असता ही पुस्तके योग्यप्रकारे ठेवण्यासाठी स्टील कपाटे उपलब्ध नसल्याचे निदर्शनास आले. तेव्हा हा महत्त्वाचा दस्ताऐवज उत्तम तऱ्हेने संरक्षित ठेवण्यासाठी दोन स्टील कपाटे कणकवली तालुका सेवानिवृत्त शिक्षक असोसिएशनने देऊ असे त्या सभेत जाहीर केले होते. त्या आश्वासनाची पूर्ती ही दोन कपाटे प्रदान करुन करण्यात आली.
असोसिएशनचे अध्यक्ष चंद्रकांत तेली यांनी या भेटवस्तू मागील पार्श्वभूमी विषद केली. सर्व सेवानिवृत्त प्राथमिक शिक्षकांच्या आर्थिक सहकार्यातूनच हे शक्य झाल्याचे सांगितले.
गटविकास अधिकारी यांनी फित कापून हा कपाटसंच स्विकारला. असोसिएशनचे ज्येष्ठ शिक्षक के. स. जाधव यांनी कपाटाच्या चाव्या गटविकास अधिकारी यांचेकडे सुपूर्द केल्या.
या कपाट प्रदान कार्यक्रमासाठी सेवानिवृत्त शिक्षक असोसिएशनचे जिल्हा सचिव सुंदर पारकर, कणकवली तालुका अध्यक्ष चंद्रकांत तेली, सचिव अनिल माळवदे, गजानन उपरकर, के.स.जाधव, चित्तरंजन पिसे, विजय पारकर, लक्ष्मण प्रभू, शंकर जाधव, रविंद्र सरंगले आदि सेवानिवृत्त प्राथमिक शिक्षकांसह पंचायत समिती अधिक्षक मनिषा देसाई, शिक्षण विभागाचे आनंद जाधव, वित्त विभागाचे धुरी यासह अनेक कर्मचारी उपस्थित होते.