मळगाव घाटीत गॅसपाईप लाईनसाठी खोदलेले चर त्वरीत बुजवा

राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी यांची मागणी

कार्यकारी अभियंता अनामिका चव्हाण यांची घेतली भेट

सावंतवाडी । प्रतिनिधी : सावंतवाडी रेडी राज्यमार्गावरील मळगाव घाटीत गॅस पाईपलाईनसाठी खोदण्यात आलेले चर वाहनधारकांसाठी धोकादायक ठरत असून येथे अपघात होण्याची मोठी शक्यता निर्माण झाली आहे. त्यामूळे हे चर तात्काळ बुजवण्यात यावेत, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी यांनी बांधकाम अभियंता अनामिका चव्हाण यांच्याकडे केली. यावेळी संबंधित ठेकेदाराला सांगून हे काम त्वरीत पूर्ण करण्यात येईल, असे आश्वासन चव्हाण यांनी दिले.

मळगांव घाटीतील गॅस पाईपलाईनचे काम स्थानिकांती बंद पाडले होते. गॅस पाईप लाईनच्या कामामूळे झाराप पत्रादेवी बायपास लगतच्या सर्व्हिस रोडची अक्षरशः चाळण झाली होती. संबंधित ठेकेदार कंपनीकडून पैसे भरून घेऊ नये बांधकाम विभागाने त्याचे नूतनीकरण केले नाही. त्यामुळे जोपर्यंत नूतनीकरण होत नाही तोपर्यंत नवीन काम सुरू करू देणार नाही असा पवित्रा स्थानिक ग्रामस्थांनी घेतला होता.

त्यानंतर पोलिसांच्या मध्यस्थीने सदरचे काम ग्रामपंचायत निवडणूक निकालानंतर त्वरित सुरू करण्यात येईल असे आश्वासन दिल्यामुळे काम पूर्ववत सुरु झाले. मात्र, खोदण्यात आलेले चर हे बुजवले गेले नसल्याने व तेथे कोणत्याही प्रकारचे सूचनाफलक अथवा बॅरिगेट्स नसल्याने अपघात होण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे हे चर तात्काळ बुजवण्यात यावे, या मागणीसाठी राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी यांचे नेतृत्वाखाली पदाधिकाऱ्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंता अनामिका चव्हाण यांची भेट घेतली.

रस्त्यालगत खणलेले हे सर तत्काळ बुजविण्यात यावेत अशी मागणी त्यांनी यावेळी केली. यावेळी पुंडलिक दळवी यांच्यासह राष्ट्रवादी शहराध्यक्ष देवा टेमकर, हिदायतुल्ला खान, आशिष कदम ,संतोष जोईल आदी उपस्थित होते.

Sindhudurg