भविष्यात पाण्याच्या समस्येमुळे जगात तिसऱ्या महायुद्धाची शक्यता

शाहनवाज शाह यांनी दिली पत्रकार परिषदेत माहिती

चिपळुणात २ जानेवारीपासून ‘चला जाणूया नदीला’ अभियान

चिपळूण | वार्ताहर : वाढते नागरीकरण आणि औद्योगिकीकरणामुळे उपलब्ध पाण्यावर ताण वाढला आहे. प्रदूषणसारख्या वाढत्या समस्यांमुळे उपलब्ध भूपृष्ठजलाची पातळी घटत आहे. यामुळे नद्यांमध्ये आलेल्या गाळामुळे त्यांच्या वहनक्षमता व साठवणक्षमता कमी झालेली आहे. या सर्व गोष्टींचा विचार करून स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवाच्या निमित्ताने ‘चला जाणूया नदीला’ या अभियानाची सुरूवात शासनाच्या वतीने करण्यात आली आहे. याचाच एक भाग म्हणून चिपळूण तालुक्यामध्ये २ जानेवारीपासून हे अभियान तालुक्यात राबविण्यात येणार असल्याची माहिती पत्रकार परिषदेमध्ये वाशिष्ठी जगबुडी नदी प्रहरी सदस्य समन्वयक शाहनवाज शाह यांनी दिली.
गेल्या काही वर्षातील पर्जन्याच्या विचलनामुळे कधी अनावृष्टी तर कधी अतिवृष्टी होत आहे. परिणामी पूर आणि दुष्कार यासारख्या समस्य वारंवार भेडसावत आहेत. पृथ्वीवर ७१ टक्के पाणी असून त्यापैकी ६ टक्के पाणी भूपातळीवर आहे. जशा माणसाच्या मुलभूत तीन गरजा आहेत, त्यापैकी अन्न ही गरज पाण्यावर विसंबून आहे. मात्र, पाण्याची पातळीच खालावत चालल्यामुळे भविष्यात पाण्याच्या समस्येमुळे जगात तिसरे महायुद्ध होऊ शकते. यासाठी ‘चला जाणूया नदीला’ हे अभियान तळागाळात पोहोचविण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.

सदर अभियानामध्ये नदी संवाद अभियानाचे आयोजन करणे, जनसामान्यांना नदी साक्षर करण्याबाबत उपाययोजना आखणे, अमृतवाहिनी बनविण्यासाठी मसुदा तयार करणे, नदीचे स्वास्थ आणि मानवी आरोग्य याबाबत प्रचार व प्रसार रूपरेषा आखणे, नदीपर्यंतचे नकाशे, नदीची पूररेषा, पाणलोट क्षेत्राचे नकाशे, मातीचे क्षरण, पर्जन्यांच्या नोंदी इत्यादी माहिती संकलित करणे, नदी संवाद यात्रा आयोजित करण्याचा आराखडा तयार करणे अशी विविध उद्दिष्टे या अभियानात आहेत.चिपळूण तालुक्यामध्ये या अभियानाची सुरूवात चिपळूण शहरातून दि. २ जानेवारीपासून होणार आहे. प्रथम इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्रापासून ही यात्रा पेठमाप येथे जाईल व याठिकाणी भाटण येथे सभा होईल. तालुक्यातील ३ जानेवारी रोजी पोफळी, शिरगाव व मुंढेतर्फे चिपळूण, दि. ४ रोजी पिंपळी खुर्द, पिंपळी बुद्रुक, चिंचघरी व खेर्डी, दि. ५ रोजी कुंभार्ली, कोंडफणसवणे, अलोरे व कोळकेवाडी, दि. ६ रोजी नागावे, पेढांबे व खडपोली, दि. ७ रोजी तिवरे, रिक्टोली, कादवड, दि. ८ रोजी तिवरे, आकले, वालोटी, दि. ९ रोजी दादर, कळकवणे, गाने, दि. १० रोजी निरबाडे, खांदाटपाली, दळवटणे, दि. ११ रोजी नवीन कोळकेवाडी, कळंबस्ते, वालोपे, पेढे, दि. १२ रोजी मिरजोळी, कोंढे, शिरळ, खोपड तर दि. १३ रोजी कालुस्ते खुर्द व गोवळकोट या गावांमधील नद्यांची माहिती व पाहणी करण्यात येणार आहे.

या कार्यक्रमाला आजी-माजी लोकप्रतिनिधी, जिल्हा परिषद, पंचायत समिती सदस्य, महाविद्यालये, तंत्रविद्यालय, बचतगट, अंगणवाडी सेविका, विविध संस्था सहभागी होणार आहेत. ग्रा.पं. हद्दीतील यात्रेचे नियोजन गटविकास अधिकारी उमा घारगेपाटील यांच्या मार्गदर्शनाखाली होणार आहे. सदरची माहिती पत्रकार परिषदेमध्ये शाहनवाज शाह यांनी दिली. यावेळी त्यांनी गावातील ग्रामस्थांना व शाळेतील विद्यार्थी, शिक्षक यांना सामिल होण्याचे आवाहन केले आहे.