रायगडचे ज्येष्ठ ग्रामीण पत्रकार शैलेश पालकर यांना ६ जानेवारीला प्रदान होणार राज्यस्तरीय आचार्य बाळशास्त्री जांभेकर दर्पण पुरस्कार

पोलादपूर | प्रतिनिधी : मराठी वृत्तपत्र सृष्टीचे जनक दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या स्मरणार्थ सन २०२१/२२ चा राज्यस्तरीय आचार्य बाळशास्त्री जांभेकर दर्पण पुरस्कार (कोकण विभाग) पत्रकारिता क्षेत्रामध्ये गेली ३५ वर्ष सामाजिक दृष्टिकोनातून ३२ वृत्तपत्रांसाठी काम करीत आहेत. महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे रायगड जिल्हा अध्यक्ष असलेले ज्येष्ठ पत्रकार शैलेश पालकर यांना महाराष्ट्र शासनाचे महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहीम रायगड जिल्हा प्रथम पुरस्कार, ग्रामस्वच्छता अभियान रायगड जिल्हा प्रथम पुरस्कार तसेच गोमांतक गोवा राष्ट्रीय पुरस्कार, महात्मा संस्थेचा अपंग सेवा पुरस्कार, ना.ना.पाटील उत्कृष्ट पत्रकार पुरस्कार अशा विविध १५ ते २० पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.

रायगड जिल्ह्यातील पोलादपूर तालुक्यातील ज्येष्ठ पत्रकार शैलेश वसंत पालकर यांना राज्यस्तरीय आचार्य बाळशास्त्री जांभेकर दर्पण पुरस्कार नुकताच जाहीर करण्यात आला आहे, हा पुरस्कार एका खास समारंभात दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या मूळ गावी पोंभुर्ले, ता. देवगड जि. सिंधुदुर्ग दर्पण सभागृहात ६ जानेवारी २०२३ रोजी सन्मानाने देण्यात येणार आहे.वडील पत्रकार साहित्यिक स्व.वसंत पालकर यांच्या पश्चात शैलेश पालकर यांनी पत्रकारितेचा वारसा पुढे सुरू ठेवला आहे.