केंद्राच्या कायाकल्प योजनेत रामपूर प्राथमिक आरोग्य केंद्र आले प्रथम

जिल्ह्यामधील २४ आरोग्य संस्थांना मिळणार १ लाख ८५ हजार रुपयांचे रोख पुरस्कार

रत्नागिरी । प्रतिनिधी : केंद्र सरकारने कायाकल्प पुरस्कार योजनेमध्ये चिपळूण तालुक्यातील रामपूर प्राथमिक आरोग्य केंद्राला प्रथम क्रमांकाचे दोन लाखाचे पारितोषिक मिळाले आहे अशी माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध आठल्ये यांनी दिली. सरकारी आरोग्य संस्थांमधून देणाऱ्या वैद्यकीय सेवांची गुणवत्ता वाढवण्यासाठी केंद्र सरकारने कायाकल्प पुरस्कार योजना हाती घेतली आहे. या योजनेत गेल्या आर्थिक वर्षात रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या २४ आरोग्य संस्थांना हा पुरस्कार जाहीर झाला आहे. यामध्ये १३ प्राथमिक आरोग्य केंद्र, तसेच ११ आरोग्य वर्धिनी केंद्र यांचा समावेश आहे. सर्व आरोग्य संस्थांनी मिळून पटकावलेली पुरस्कारांची रक्कम ११ लाख ८५ हजार रुपये एवढी आहे.

कायाकल्प पुरस्कार अंतर्गत जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रामधून रामपूर (चिपळूण) प्राथमिक आरोग्य केंद्राला प्रथम क्रमांकाचे रु. दोन लाखाचे पारितोषिक मिळाले असून शिरगांव (चिपळूण), कापरे (चिपळूण), कोळवली (गुहागर), कोरेगांव (खेड), दादर (चिपळूण), धारतळे (राजापूर), कुंबळे (मंडणगड), जैतापूर (राजापूर), फुरूस (चिपळूण), ओणी (राजापूर), अडरे (चिपळूण), साटवली (लांजा) या प्राथमिक आरोग्य केंद्राना प्रत्येकी रु. ५० हजाराचे प्रोत्साहनपर पारितोषिक मिळाले आहे. तसेच जिल्ह्यातील आरोग्य वर्धिनी केंद्रामधून आंबडवे (मंडणगड) केंद्राला प्रथम क्रमांकाचे रु. एक लाखाचे पारितोषिक मिळाले असून भिले (चिपळूण) केंद्राला द्वितीय क्रमांकाचे रु.५० हजाराचे पारितोषिक, निर्व्याळ (चिपळूण) केंद्राला तृतीय क्रमांकाचे रु. ३५ हजाराचे पारितोषिक मिळाले असून पेढांबे (चिपळूण), टेरव (चिपळूण), कोळकेवाडी (चिपळूण), वेळणेश्वर (गुहागर), मांडकी (चिपळूण), पिंपळीखुर्द (चिपळूण), काटवली (संगमेश्वर), मांडवे (खेड) या आरोग्य वर्धिनी केंद्राना प्रत्येकी रु. २५ हजाराचे प्रोत्साहनपर पारितोषिक मिळाले आहे. या रकमेचा उपयोग आरोग्य संस्थांच्या गुणवत्तेचा दर्जा वाढविण्यासाठी, सर्वसामान्यांना उत्कृष्ट सेवा सुविधा देण्यासाठी केला जाईल असे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध आठल्ये यांनी सांगितले.

केंद्र सरकारने सरकारी रुग्णालयातील आरोग्य सेवांचे बळकटीकरण व वैद्यकीय सेवेचा दर्जा वाढविण्यासाठी २०१५ पासून कायाकल्प पुरस्कार योजना सुरु केली आहे. पूर्वी योजनेत जिल्हा रुग्णालये, उपजिल्हा रुग्णालये, महिला रुग्णालये व प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या गटात स्पर्धा घेण्यात येत होती, मागील वर्षापासून स्पर्धेत आरोग्य वर्धिनी केंद्रांचाही समावेश करण्यात आला आहे. पुरस्कारासाठी रुग्णालयाची आतील व परिसर स्वच्छता, निर्जंतुकीकरण, बेड स्वच्छता, उपलब्ध साधनांचा वापर, अधिकारी व कर्मचाऱ्यांची कार्यक्षमता, रुग्णसेवा, बायोमेडिकलसह घन व द्रवरूप कचऱ्याची विल्हेवाट, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, व पाणीबचत, सांडपाण्याचा निचरा आदी प्रत्येक बाबीसाठी गुण आहेत. आयएसओ मानांकनाच्या धर्तीवरील या पुरस्कारासाठी आरोग्य संस्थेतील अधिकारी व कर्मचारी सुविधा उपलब्ध करून स्वतः तपासणी (सेल्फ असेसमेंट) करून प्रस्ताव देतात, त्यानुसार जिल्हास्तरीय व राज्यस्तरीय समितीकडून तपासणी केली जाते व संस्थाना प्रथम, द्वितीय, तृतीय व प्रोत्साहनपर रोख पुरस्कार देऊन गौरविण्यात येते. सर्व पुरस्कार प्राप्त प्राथमिक आरोग्य केंद्र व आरोग्य वर्धिनी केंद्रातील अधिकारी, कर्मचारी यांचे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. कीर्तीकिरण पुजार व जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध आठल्ये यांनी अभिनंदन केले आहे.