राज्यस्तरीय शालेय कॅरम स्पर्धेत मयुरेश नाईक व केशर निर्गुण उपविजेते

राष्ट्रीय कॅरम स्पर्धेसाठी दोघांचीही निवड

सावंतवाडी । प्रतिनिधी :

क्रीडा व युवक सेवा संचालनालय पुणे, जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी सिंधुदुर्ग आयोजित, सिंधुदुर्ग डिस्ट्रिक्ट कॅरम असोसिएशनच्या सहकार्याने राज्यस्तरीय शालेय कॅरम स्पर्धा यशवंतराव भोसले पॉलिटेक्निक सावंतवाडी येथे २४ व २५ डिसेंबर रोजी पार पडल्या. या स्पर्धा १९ वर्षाखालील मुले व मुली या गटात खेळविण्यात आल्या. स्पर्धेसाठी सिंधुदुर्ग डिस्ट्रिक्ट कॅरम असोसिएशनचे मोलाचे सहकार्य लाभले.

यात १९ वर्षाखालील मुलांच्या गटात मळगाव सावंतवाडी येथील, राणी पार्वती देवी ज्युनियर कॉलेज सावंतवाडीचा विद्यार्थी मयुरेश तुळशीदास नाईक याने उपविजेतेपद पटकावले. त्याला नागपूरच्या मो. आमीन अख्तर याने पराभूत केले. मुलींच्या गटात सावंतवाडी च्या केशर राजेश निर्गुण उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. तिला मुंबईच्या समृद्धी घाडीगावकर हीने पराभूत केले. सिंधुदुर्गातून चार खेळाडू सहभागी झाले होते. या दोन्ही खेळाडूंची राष्ट्रीय कॅरम स्पर्धेसाठी निवड झाली आहे.

स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ जिल्हा क्रीडा अधिकारी विद्या शिरस, श्री. विजय शिंदे सौ. मनीषा पाटील, श्याम देशपांडे, सिंधुदुर्ग डिस्ट्रिक्ट कॅरम असोसिएशनचे सचिव श्री. योगेश फणसळकर यांच्या उपस्थितीत पार पडला. स्पर्धेसाठी सिंधुदुर्ग डिस्ट्रिक्ट कॅरम असोसिएशनचे मोलाचे तांत्रिक सहकार्य लाभले.

  • Sindhudurg