शोषणमुक्त समाजासाठी ग्राहक प्रबोधन गरजेचे – निलेश गोयथळे

गुहागरात राष्ट्रीय ग्राहक दिन साजरा

गुहागर |प्रतिनिधी : विद्यार्थी हा ग्राहक असून त्यांना हक्क आणि कर्तव्याची जाणीव झाल्यास पदोपदी होणारी ग्राहकांची फसवणूक टाळता येईल. त्यासाठी शोषणमुक्त समाजासाठी ग्राहक प्रबोधन आवश्यक आहे, असे प्रतिपादन अखिल भारतीय ग्राहक पंचायतीचे जिल्हा कार्यकारिणी सदस्य श्री. निलेश गोयथळे यांनी केले. गुहागर तालुका अखिल भारतीय ग्राहक पंचायतीचे अध्यक्ष श्री. गणेश धनावडे यांच्या अध्यक्षतेखाली येथील श्री देव गोपाळ कृष्ण माध्यमिक विद्यामंदिरमध्ये राष्ट्रीय ग्राहक दिन साजरा करण्यात आला. यावेळी स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. याप्रसंगी ग्राहक पंचायतीचे सचिव प्रदीप पवार, कार्यकारिणी सदस्य प्रवीण कागुटकर, मुख्याध्यापक शिवाजी आडेकर, उप मुख्याध्यापक सुधाकर कांबळे आदी उपस्थित होते.

यावेळी विद्यार्थ्यांना ग्राहक पंचायतीच्या कार्याविषयी माहिती दिली. ग्राहक पंचायतीचे संस्थापक बिंदुमाधव जोशी यांनी ग्राहकांच्या न्याय हक्कासाठी ग्राहक संरक्षण कायदा होण्यासाठी मोठा संघर्ष केला आहे. ग्राहक संरक्षण कायदा संसदेत कोणत्याही प्रकारचा विरोध न होता पारित केला आहे. २०१९ चा सुधारित कायदासुद्धा ग्राहकांसाठी अत्यंत लाभदायक असून त्याचा सर्वांनी अभ्यास करावा. विद्यार्थ्यांनीही ग्राहक पंचायतीच्या प्रवाहात सामील होऊन स्वःता बरोबरच आपल्या परिसरातील नागरिकांची होत असलेली फसवणूक थांबविण्यासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले. तालुकाध्यक्ष गणेश धनावडे म्हणाले, लुटणारा वर्ग संघटित आहे पण ग्राहक संघटित नाहीत. ग्राहकांना न्याय मिळवून देण्यासाठी अखिल भारतीय ग्राहक पंचायत कटिबद्ध आहे. ग्राहकांनी जागरूकपणे होणाऱ्या शोषणाविरुद्ध संघर्ष करावा. ग्राहक संरक्षण कायद्याचे महत्त्व अनन्य साधारण आहे. या कायद्याची अंलबजावणी प्रभावीपणे होण्यासाठी विद्यार्थ्यांनी पुढाकार घ्यावा. विद्यार्थ्यांनी खरेदी केलेल्या वस्तूमध्ये फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यास त्यांनी थेटपणे संबंधित दुकानदारशी बोलावे. अन्यथा ग्राहक पंचायतीकडे आपले म्हणणे मांडावे.

तुमची समस्या नक्कीच दूर होईल, असे ते म्हणाले. प्रवीण कागुटकर यांनी गॅस, आरोग्य, पेट्रोल पंप, वीज, मेडिकल स्टोअर्स, मोबाईल, आठवडे बाजार आदी ठिकाणी होणारी ग्राहकांची फसवणूक याची उदाहरणे देत एखाद्या वस्तूची छापील किंमतीपेक्षा जादा दर आकारणे याची तक्रार वजनमाफ विभागाकडे करता येते, असे सांगितले. उप मुख्याध्यापक सुधाकर कांबळे यांनी गॅरंटी म्हणजे वस्तू बदलून देणे आणि वॉरंटी म्हणजे वस्तू दुरुस्त करून देणे. दुरुस्तीचा खर्च नाही. फसव्या जाहिरातीच्या मोहजाळ्यात न अडकता खरेदी केलेल्या वस्तूची पक्की पावती घ्यावी, तरच तक्रार करता येते, असे सांगितले. मुख्याध्यापक शिवाजी आडेकर यांनी अखिल भारतीय ग्राहक पंचायतीची व्याप्ती खूप मोठी आहे. भविष्याचा व्यवहारिक पाया मजबूत होण्यासाठी विद्यार्थ्यांनी ग्राहक पंचायतीच्या कार्याचा अभ्यास करावा. स्वतःबरोबरच या प्रवाहातून सामाजिक कामही आपल्या हातून नकळत घडेल, असे त्यांनी सांगितले.