शिक्षणाधिकारी सौ सुवर्णा सावंत यांचे कडून गौरवोद्गार
माखजन |वार्ताहर :
ग्रामीण भागात विद्यार्थ्यांना सगळ्या सुखसोयी उपलब्ध करून देणे जिकिरीचे असते.परंतु माखजन इंग्लिश स्कूल चे ग्रामीण भागातील शैक्षणिक काम उल्लेखनीय असून कौतुकास्पद असल्याचे गौरवोद्गार रत्नागिरी जिल्ह्याच्या माध्यमिक शिक्षणाधिकारी सौ सुवर्णा सावंत यांनी काढले.त्या माखजन इंग्लिश स्कूल मध्ये आंतरशालेय क्रीडा स्पर्धांच्या उदघाटना प्रसंगी बोलत होत्या.
यावेळी व्यासपीठावर संस्थेचे व कार्यक्रमाचे अध्यक्ष आनंद साठे,उपशिक्षणाधिकारी श्री गोपाळ चौधरी,प्रकाश रेडीज,शिक्षण विस्तार अधिकारी विनायक पाध्ये,जिल्हा कलाध्यापक संघाचे अध्यक्ष इम्तियाज शेख,जिल्हा विज्ञान मंडळाचे अध्यक्ष व शिक्षक परिषदेचे कोकण विभाग अध्यक्ष रवींद्र इनामदार,मुख्याध्यापिका सौ रूही पाटणकर,इंग्लिश मिडीयम च्या मुख्याध्यापिका धनश्री राजेसावंत उपस्थित होते.
सौ सावंत पुढे म्हणाल्या की शैक्षणिक धोरणा प्रमाणे विद्यार्थी हा सर्व गुण संपन्न झाला पाहिजे,आणि माखजन इंग्लिश स्कूल मध्ये हेच सारे गुण विद्यार्थ्यांच्या अंगी वाढीस लागण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न सुरू असून वाखाणण्याजोगे असल्याचे नमूद केले.यावेळी शाळेत चाललेल्या विविध कार्यक्रमांचे त्यांनी कौतुक केले.
आंतरशालेय क्रीडा स्पर्धांचा शुभारंभ,शाळेच्या मूळ माखजन येथील ठिकाणाहून क्रीडा मशाल आणून करण्यात आली.या मशालीचे सर्वत्र स्वागत करण्यात आले.विद्यार्थ्यांनी क्रीडा गीत सादर केले.
या कार्यक्रमावेळी शिक्षण विस्तारअधिकारी विनायक पाध्ये,प्रकाश रेडीज यांनी मनोगत व्यक्त केली.यावेळी मान्यवरांच्या समोर मल्लखांब प्रकारचे व योगा प्रकारातील प्रात्यक्षिक झाले.दरम्यान मल्लखांब व क्रीडा प्रकारात मार्गदर्शकाच काम करणारे गणेश कुंभार,सचिन साठे,निखिल वारके यांचे शिक्षणाधिकारी सौ सुवर्णा सावंत यांनी पुष्पगुच्छ देऊन कौतुक केले.यावेळी सौ सावंत व ,उपशिक्षणाधिकारी गोपाळ चौधरी यांचे हस्ते नाणेफेक होऊन सामन्यांना सुरवात झाली.
श्री आनंद साठे यांनी अध्यक्षीय मनोगत व्यक्त केले.कार्यक्रमाला उपाध्यक्ष मनोज शिंदे,सचिव राजेश फणसे,पराग लघाटे,विनायक केळकर, दत्ताराम गुरव ,करजुवे हायस्कुल चे मुख्याध्यापक अशोक कुवळेकर,शंकर कवळकर,विद्यार्थी प्रतिनिधी कुणाल कवळकर,विद्यार्थिनी प्रतिनिधी ज्ञानद धामणसकर आदी उपस्थित होते.कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापिका सौ रुही पाटणकर,सूत्रसंचालन महादेव परब,तर आभार स्नेहसंमेलन प्रमुख महादेव शिंदे यांनी मानले.