शिरसोलीची धनश्री जाधव हिची नासा भेटीसाठी निवड

दापोली (प्रतिनिधी)सर्वत्र अभिनंदनाचा वर्षाव. दापोली तालुक्यातील जि.प. शिरसोली शाळेची सामान्य कुटुंबातील विद्यार्थीनी कु.धनश्री संजय जाधव ही ठरली गगन भरारीसाठी भाग्यवंत. तालुक्यातून शिगेला लागलेली उत्सुकता अखेर धनश्री संजय जाधव हिने नासासाठी तर जालगावची तनिष्का जयंत बोधगावकर आणि मळे शाळेतील सुयश सुनील गोसावी यांनी इस्त्रो भरारीसाठी चार चाळणी चाचणी मधून अंतिम विजेते पद पटकावले.
जि.प.शाळेत शिकणारी ही मुले कुशाग्र बुद्धिची असल्याचे त्यांनी सिध्द केले आहे. याबद्दल शिरसोली येथे गटशिक्षणअधिकारी अण्णासाहेब बळवंतराव,जाणू विज्ञान अनुभवो विज्ञान या उपक्रमाचे दापोलीचे प्रमूख उत्तम राठोड,पालगड शिक्षण विस्तार अधिकारी सुनिल सावंत तसेच पद्मन लहांगे यांनी शिरसोली शाळेत जाऊन मार्गदर्शक शिक्षक व धनश्री यांचा सत्कार करुन भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.जिथे कोणत्याही प्रकारचे नेटवर्क नाही अशा शिरसोली गावच्या मराठी शाळेतील विद्यार्थीनीला अमेरिका नासाला जाण्याची संधी मिळाली तालुक्याची गुणवत्ता कायम ठेवत अगदी केंद्रापासून जिल्ह्यापर्यंत झालेल्या वस्तुनिष्ठ चाळणी परीक्षेत शिरसोली शाळेचे यश हे भुषणावह असल्याचे उत्तम राठोड यांनी सांगितले;तर गावाच्या भिंतीवर सुवर्णाक्षराणी कोरावं असं नाव शिरसोलीची धनश्री होय असे पद्मन लहांगे यांनी गौरवोद्गार व्यक्त केले. तर अश्रुंची झाली फुले असा शब्दगौरव विस्तार अधिकारी सुनील सावंत यांनी यावेळी केला.
माता ही मुलाच्या यशाची पहीली गुरु असते, तालुक्यातील साडेसत्तावीसशे मुलांमधून एकच धनश्री जिने एवढी इर्षा आणि जिद्दीने प्रयत्न करुन यशश्री खेचून आणली असून शिरसोलीची ही कन्या एक दिवस विज्ञानक्षेत्रात चमकदार कामगिरी नक्कीच करेल. जिद्द आणि परिश्रमातून संघर्ष करीत हे यश मिळविले त्याबद्दल दापोली तालुक्याच्यावतीने तिचे अभिनंदन करुन शुभेच्छा दिल्या.
यश आणि अपयश यामध्ये एक किनार असते, ती अपयशाकडे झुकली तरी अपयश ही यशाची पहिली पायरी असते,हे विसरता येणार नाही असे याच शाळेतील तालुक्यापर्यंत ज्या इतर सहा विद्यार्थ्यांची निवड झाली होती;पण पुढे अपयश आले त्यांना मार्गदर्शन करतांना गटशिक्षणाधिकारी बोलत होते. स्वागत पदवीधर शिक्षक संदीप भेकत यांनी तर आभार प्रदर्शन शाळा व्यवस्थापन समिती शिक्षणतज्ञ अरविंद जाधव यांनी केले.
प्रारंभी प्रास्ताविकात मुख्याध्यापक मजीद नांदगावकर यांनी धनश्रीच्या यशात आपल्या सहकार्‍यांचा,तसेच अधिकारी आणि पालकांचा मोलाचा सहभाग असल्याचे सांगितले. यावेळी गणिताचा भास्कराचार्यही आमचाच असेल असे शाळेच्या वतीने संदीप भेकत यांनी सांगितले. तर आपली नासा वारीसाठी झालेली निवड सार्थ ठरवू असे धनश्रीने मनोगत व्यक्त केले.