राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी यांचा आरोप
प्रशासनाकडून जनतेचा पैसा घालविला जातोय वाया
सावंतवाडी । प्रतिनिधी :
सावंतवाडी शहरातील सालईवाडा भागात सुरु असलेल्या गटार योजनेचे काम हे बोगस पद्धतीने सुरू असून या कामावर कोणत्याही अधिकाऱ्याचं किंवा ठेकेदाराचे लक्ष नाही. या कामासाठी वापरली जाणारी वाळू देखील बोगस आहे. यामुळे जनतेचा निधी वाया घालवण्याचे काम नगरपालिका प्रशासन करत असल्याचा आरोप राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी यांनी केला.
सावंतवाडी शहरातील सालईवाडा भागात सुरू असलेल्या गटाराच्या दुरुस्तीचे काम हे चुकीच्या पद्धतीने सुरू असल्याचं स्थानिक नागरिकांना निर्दशनात आल्यानंतर त्यांनी तात्काळ राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी यांच्याशी संपर्क साधून त्यांच्या कानावर ही गोष्ट घातली. यावेळी दळवी हे त्वरित आपल्या सहकाऱ्यांसह घटनास्थळी दाखल होत पाहणी केली असता त्यांच्याही ही बाब निर्देशनास आली. त्यानंतर त्यांनी संबंधित ठेकेदाराला व नगरपालिका अधिकाऱ्यांना बोलवून हे काम थांबवण्याचा निर्णय घेतला.
जोपर्यंत कामासाठी चांगल्या प्रकारे वाळूचा व अन्य गोष्टींचा वापर केला जात नाही तोपर्यंत हे काम सुरू करण्यात येता कामा नये, असा इशारा त्यांनी संबंधित पालिका प्रशासन अधिकारी व ठेकेदाराला दिला. जोपर्यंत चांगल्या दर्जाच काम होत नाही तोपर्यंत हे काम करू देणार नाही तोवर ठेकेदारच बील अदा करण्यात येवू नये, अशी मागणीही पुंडलिक दळवी यांनी केली.
यावेळी पुंडलिक दळवी यांच्यासह राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष देवेंद्र टेमकर, उद्योग व्यापार कार्याध्यक्ष हिदायतुल्ला खान, बाबल्या दुभाषी, बावतीस फर्नांडिस, आशिष कदम, इफ्तेकार राजगुरू, अशोक पवार, आगस्तीन फर्नांडिस आदी उपस्थित होते.
Sindhudurg