सावंतवाडी । प्रतिनिधी :
सावंतवाडी शहरातील प्रभागवार कचरा गोळा करण्यासाठी नगरपालिकेतर्फे लवकरच ई-रिक्षा वापरण्यात येणार आहेत. त्यामुळे सध्या वापरण्यात येणाऱ्या घंटा गाड्या बंद केल्या जाणार आहेत. सावंतवाडी नगरपालिकेच्या ताफ्यात बॅटऱ्यांवर चालणाऱ्या व लहान गल्लीत सहज पोहोचू शकतील, अशा सहा ई-रिक्षा दाखल झाल्या आहेत. त्यामुळे इंधन बचत व कर्मचाऱ्यांचा त्रास कमी होणार आहे. लवकरच नागरिकांच्या सेवेत या ई-रिक्षा वापरात येणार आहेत, अशी माहिती पालिकेच्या अधिकाऱ्यांनी दिली.
सदर इ – रिक्षा आ. दीपक केसरकर यांच्या स्थानिक विकास निधी अंतर्गत साडे अठरा लाख निधीतून खरेदी करण्यात आल्या आहेत. सदरच्या रिक्षा नगरपालिकेच्या ताफ्यात शनिवारी दाख.ल झाल्या. या गाड्या टप्प्याटप्प्याने सेवेत दाखल होणार आहेत. सध्या वापरण्यात येणाऱ्या घंटागाड्यंऐवजी ई-रिक्षा दिसणार आहेत. रिक्षा लहान असल्याने गल्लीपर्यंत जाऊ शकते. त्यामुळे कर्मचाऱ्यांना होणारा शारीरिक त्रास व इंधनाची बचत होणार आहे. तसेच वेळेअभावी घराजवळ साचून राहणारा ओला व सुका कचरा वेळेत उचलला जाऊन कचऱ्यापासून होणारी दुर्गधी कमी होणार आहे. कचरा गोळा करून तो लगेच कचरा डेपोत नेला जाणार आहे.
सध्या घंटागाड्यांमधून गोळा करण्यात येणारा कचरा कर्मचारी एका ठिकाणी गोळा करून ठेवतात. त्यानंतर मोठी कचरा गाडी येईपर्यंत कर्मचाऱ्यांना वाट पाहावी लागते. मात्र, आता थेट ई रिक्षाच दारी येणार आहे. तत्काळ कचरा उचलला जाणार असल्याने कर्मचाऱ्यांच्या आरोग्यावर परिणाम होणार नाही. काही तांत्रिक बाबी पूर्ण झाल्यानंतर नव्याने दाखल झालेल्या ई-रिक्षांचा लोकार्पण सोहळा होणार आहे. नागरिकांनी कचरा आपल्या घराजवळ ठेवावा व अन्य ठिकाणी टाकू नये, असे आवाहन करण्यात आले आहे.
Sindhudurg