लेक लाडकी अभियान महाराष्ट्र राज्यने केला सामाजिक कार्याचा गौरव
गुहागर | प्रतिनिधी : सामाजिक कार्यात नेहमीच अग्रेसर असणाऱ्या महेश शिगवण यांना राष्ट्रचेतना पुरस्कार 2022 हा पुरस्कार देऊन नुकतेच प्रेस क्लब हॉल मुंबई येथे गौरविण्यात आले.लेक लाडकी अभियान महाराष्ट्र राज्यच्यावतीने सानेगुरुजी यांच्या जयंतीनिमित्त हा गौरव प्रदान करण्यात आला. तालुक्यातील तळवली येथील सामाजिक कार्यकर्ते सध्या व्यावसायानिमित्त दुबई येथे वास्तव्यास असणारे महेश शिगवण यांनी बाहेरगावी राहूनही आपल्या जन्मभूमीसाठी कायम मदतीचा हात देत असतात.कोरोना काळात त्यांनी गरीब व गरजूंना मदतीचा हात दिला होता त्याचप्रमाणे इतर सामाजिक स्तरावर देखील त्यांनी वेळोवेळी मदतीचा हात दिला आहे.त्यांच्या या कामाची दखल घेऊन लेक लाडकी अभियान महाराष्ट्र राज्य यांनी महेश शिगवण यांचा राष्ट्रचेतना पुरस्कार 2022 ने गौरव केला. शिवसेना माजी महापौर स्नेहल आंबेकर यांच्याहस्ते महेश शिगवण यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.या पुरस्काराबद्दल महेश शिगवण यांचे सर्वस्तरातून अभिनंदन होत आहे.