कर्ज योजनांचा लाभ घेऊन महिलांनी व्यावसायिक बनावे – प्रिती पटेल

बाया कर्वे कौशल्य विकास केंद्रात प्रमाणपत्र वितरण कार्यक्रम संपन्न

रत्नागिरी : ब्युटीपार्लर असो वा फूड प्रोसेसिंग, फॅशन डिझायनिंग व्यवसायासाठी कर्जपुरवठा केला जातो. त्यातून महिलांनी व्यावसायिक बनावे, असे आवाहन शामराव पेजे आर्थिक महामंडळाच्या जिल्हा व्यवस्थापिका प्रीती पटेल यांनी केले.

शिरगाव येथील महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेच्या बाया कर्वे कौशल्य विकास केंद्रात विविध अभ्यासक्रमांच्या प्रमाणपत्र वितरण कार्यक्रमात त्या बोलत होत्या. या वेळी शिरगाव प्रकल्पाच्या स्थानिय समितीचे सदस्य प्रसन्न दामले, रत्नागिरी प्रकल्प समन्वयक स्वप्निल  सावंत आणि बीसीए कॉलेजच्या प्रभारी प्राचार्या स्नेहा कोतवडेकर व्यासपीठावर उपस्थित होते.

बाया कर्वे कौशल्य विकास केंद्र कोरोना महामारीच्या निर्बंधांमुळे बंद ठेवण्यात आले होते. परंतु आता सर्व निर्बंध उठल्यामुळे जून-जुलै मध्ये ब्युटीपार्लर, फॅशन डिझायनिंग व फूड मेकिंग कोर्स सुरू केले आहेत. याबरोबरच मागणीनुसार नवनवे अभ्यासक्रम सुरू करण्यात येत असून याला कॉलेजच्या मुली, महिला, गृहिणींचा प्रतिसाद मिळत आहे. जास्तीत जास्त महिलांनी या कोर्सेसचा लाभ घ्यावा, असे आवाहन स्वप्निल सावंत यांनी केले.

याप्रसंगी महर्षी कर्वे संस्थेबद्दलची माहिती स्नेहा कोतवडेकर यांनी दिली. तसेच सर्टिफिकेट कोर्स केल्यानंतर ऍडव्हान्स कोर्स करण्याकरिता आपल्या येथे महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेत सुविधा आहे. तसेच पुण्यात ही संस्थेचे विविध डिप्लोमा डिग्री कोर्स असतात तिथे आपण माहिती घेण्यासाठी जाऊ आणि व्यवसाय वाढीसाठी काम करू, असे प्रसन्न दामले यांनी सांगितले.

या वेळी मान्यवरांच्या हस्ते यशस्वी विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र वितरण करण्यात आली. सूत्रसंचालन फॅशन डिझायनिंग कोर्सच्या इस्न्ट्रक्टर सौ. वृषाली नाचणकर यांनी केले तर संचिता पेठे व अंतरा फडणीस यांनी विद्यार्थिनींनी आपले अनुभव  मनोगतातून व्यक्त केले.