..तर केसरकरांनी नगरपालिका निवडणुकीत एकटेच लढावे : संजू परब

पक्षाने संधी दिल्यास विधानसभा लढविण्यास इच्छुक

आम्ही सुरू केलेली विकास कामे कोणी थांबवली हे लवकरच जाहीर करेन

सावंतवाडी । प्रतिनिधी : निवडणूका आल्या की मंत्री दीपक केसरकर यांना युतीची आठवण होते. विकासकामांच्या उद्घाटनावेळी मात्र मित्रपक्षाचा विसर पडतो. मोती तलावाच्या कोसळलेल्या संरक्षण भिंतीच्या दुरुस्ती कामाचे भूमिपूजन केसरकर यांनी केवळ आपल्याच कार्यकर्त्यांना सोबत घेऊन केले. भाजपच्या कोणत्याही पदाधिकाऱ्यांना त्यांनी आमंत्रित केले नाही. त्यामुळे आता होऊ घातलेल्या सावंतवाडी नगरपालिकेच्या निवडणुकीतही युतीसाठी राजन तेलींना फोन करू नये. यापूढे एकटेच लढा, असे आव्हान भाजपचे जिल्हा प्रवक्ते तथा माजी नगराध्यक्ष संजू परब यांनी दिले. सावंतवाडी येथील संपर्क कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

मोती तलावात वर्षानुवर्ष साचलेला गाळ काढून तलाव स्वच्छ करावा यासाठी सर्वपक्षीय पदाधिकारी व कार्यकर्ते एकत्र आले. सर्व पक्ष आणि एकत्र येत ते कामही पूर्ण केले. मात्र तलावाचा संरक्षक कठडा कोसळल्यानंतर त्याच्या दुरुस्तीच्या कामाचे भूमिपूजन एकट्या केसरकारांनीच केले. जिल्ह्यात भाजपचा पालकमंत्री आहे हे त्यांनी विसरु नये. यापुढे त्यांना या गोष्टीचा विसर पडू नये अशी अपेक्षा आहे. अन्यथा पुढील निवडणुका त्यांनी स्वबळावर लढाव्या आमच्या नेत्यांना गळ घालू नये. आम्ही सक्षम आहोत असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.सदर कामाच्या उद्घाटनाचे निमंत्रण हे सार्वजनिक बांधकाम विभागाच्यावतीने देणेही गरजेचे होते. मात्र, कार्यकारी अभियंता अनामिका चव्हाण यांनी तसे केले नाही. सत्ता कोणाची आहे हे कदाचित त्या विसरले असतील त्यामुळे त्यांनाही सत्ता काय असते हे दाखवून देऊ, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

नगरपालिकेतील आमच्या सत्ताकाळात आम्ही सुरू केलेली विकासकामे सध्या बंद आहेत. कोणीतरी ती थांबवलेली आहेत. जनरल जगन्नाथराव भोसले शिव उद्यानातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या कामासाठी निधी मंजूर झाला. त्याचे भूमिपूजनही झाले. मात्र, काम अद्याप सुरू झाले नाही. श्रीराम वाचन मंदिर समोरील सेल्फी पॉईंटच्या बाबतही तेच झाले आहे. मात्र ही कामे नेमकी कोणाच्या सांगण्यावरून थांबली आहेत याचा अभ्यास करून त्यावर भाष्य करण्यात येईल, असे त्यांनी स्पष्ट केले.आमची सत्ता असताना केशवसुत कट्टा नादुरुस्त झाल्याने तो नगरपालिका प्रशासनाने निर्लेखित केला होता. मात्र, त्यानंतर प्रशासकाच्या काळात याच कट्ट्याची दुरुस्ती करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. त्यामुळे भविष्यात या ठिकाणी कोणतीही दुर्घटना घडल्यास त्याला पूर्णपणे नगरपालिका प्रशासनच जबाबदार राहील, असा इशाराही त्यांनी दिला.

पक्षाने संधी दिल्यास आमदार व्हायला आवडेल : संजू परब

ग्रामपंचायत निवडणुकीत सावंतवाडी तालुक्यासह विधानसभा मतदारसंघात भाजपची ताकद वाढल्याचे सिद्ध झाले. भाजप या ठिकाणी एक नंबरचा पक्ष आहे. त्यामुळे तुम्ही विधानसभा निवडणूक लढविण्यास इच्छुक आहात का या प्रश्नाला उत्तर देताना संजू परब म्हणाले, आमदार होण्याची माझी इच्छा आहेच. पक्षाने तशी संधी दिल्यास मी नक्कीच निवडणूक लढवीन. मात्र, मला सोडून अन्य कोणाला पक्षाने तिकीट दिल्यास त्याचेही काम प्रामाणिकपणे करेन, असेही त्यांनी आवर्जून सांगितले.