एलसीबीच्या पथकाने राखले सामाजिक भान
कणकवली : मुंबई गोवा महामार्गावर वागदे डंगळवाडी येथे मांजर आडवे आल्याने मोटरसायकल घसरून वृद्धेसह चालक जखमी झाला. सावंतवाडी तालुक्यातील चौकुळ येथील शुभांगी आत्माराम गावडे (वय ६८ ) सत्यवान आत्माराम गावडे (वय ३९ ) अशी जखमींची नावे आहेत. हा अपघात आज सकाळी ११:०० वाजता घडला हा अपघात घडत असतानाच ओरोस हुन कणकवली च्या दिशेने जाणाऱ्या सिंधुदुर्ग एलसीबी च्या पथकातील हवालदार राजू जामसंडेकर, हवालदार आशिष गंगावणे, चालक रवी इंगळे यांनी तात्काळ आपल्या शासकीय वाहनातून शुभांगी आणि सत्यवान यांना कणकवली उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले.
डॉ चौगुले यांनी दोन्ही जखमींवर प्राथमिक उपचार केले. या अपघातात जखमी शुभांगी यांच्या डोकीला मार लागला असून प्रथमदर्शनी कान आणि नाकातून रक्त येत होते. तर सत्यवान गावडे यांचा उजवा हात दुखापतग्रस्त झाला आहे. चौकुळ येथील गावडे माता पुत्र ओरोस येथे कामानिमित्त मोटरसायकल ने जात होते. ओरोस येथे उड्डाणपुलावर लक्षात न आल्यामुळे ते ओरोस ऐवजी पुढे कणकवलीपर्यंत आले. चौकशी केली असता त्यांना ओरोस मागे राहिल्याचे लक्षात आल्यानंतर मोटरसायकल चालक सत्यवान आपल्या आईसह मोटरसायकल ने पुन्हा ओरोस च्या दिशेने जात होता. दरम्यान वागदे येथे रस्त्यावर मांजर आडवे आल्यामुळे सत्यवान याचे नियंत्रण सुटून मोटरसायकल रस्त्यावर आदळली. त्यात सत्यवान सह मागे बसलेली त्याची आई शुभांगी जखमी झाली. एलसीबीच्या कर्मचाऱ्यांच्या दक्षतेमुळे दोन्ही जखमींवर तात्काळ उपचार शक्य झाले. एलसीबी कर्मचारी आशिष गंगावणे, राजू जामसंडेकर, रवी इंगळे यांनी सामाजिक भान जपत अपघातग्रस्तांना वेळीच रुग्णालयात दाखल केल्यामुळे तात्काळ जखमींवर वैद्यकीय उपचार सुरू झाले.