विद्यार्थी रमले आकाश दर्शनात

गुहागर | प्रतिनिधी : रा. स्व. संघ जनकल्याण समिती उत्तर रत्नागिरी जिल्हा फिरती विज्ञान प्रयोगशाळा प्रकल्प गुहागर यांच्या वतीने गुहागर तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या २० शाळांमध्ये हा प्रकल्प सुरु आहे. या शाळांमध्ये स्वतंत्र प्रयोगशाळा नसते, त्यामुळे मुलांना त्या पासून वंचित रहावे लागते. ही गरज ओळखून हा प्रकल्प सुरु करण्यात आला. या प्रकल्पाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांसाठी विविध उपक्रम राबविले जातात. विद्यार्थ्यांना आकाश निरीक्षणाची आवड निर्माण व्हावी. त्यांच्यामध्ये आकाशाबद्दल असणारे कुतूहल जागृत व्हावे. निरीक्षण शक्तीचा विकास व्हावा या हेतूने. या प्रकल्पाच्या वतीने आकाश निरिक्षणाचा कार्यक्रम घेण्यात आला. रात्रीच्या वेळी आकाशात पाहिले असता आपल्याला असंख्य चांदण्या दिसतात.काही फिकट दिसतात.त्यांच्या रंगांमध्ये, चमकण्यामध्ये, प्रखरतेमध्ये विविधता आढळते. या विश्वाच्या अफाट पसाऱ्यात काय दडले आहे ? हा तरा कोणता असेल? हा तारका समुह कोणता असेल? असे एक ना अनेक प्रश्न आपल्याला पडतात. या प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी खगोल अभ्यासक दिपक आंबवकर तारांगण ग्रुप चिपळूण यांच्या अभ्यासपूर्ण मार्गदर्शनाखाली ही कार्यशाळा घेण्यात आली.

आकाश निरीक्षणात विद्यार्थ्यांनी टेलिस्कोपमधू सूर्यमालेतील सर्वात मोठा ग्रह गुरु पाहिला. गुरु ग्रह आणि त्यावर असणारे तांबूस रंगाचे पट्टे, त्याच्या जवळ असणारे उरोपा, आयो, गनिमिड आणि कॅलिस्टो हे चार चंद्रही पाहिले. सूर्यमालेतील देखणे रत्न म्हणजे शनी ग्रह त्याच्या भोवती असणारे कडे पाहताना विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर वेगळेच समाधान दिसत होते. आपल्या ओघवत्या शैलीत खगोल आणि भूगोलप्रेमी दिपक आंबवकर सर यांनी विद्यार्थ्यांना खिळवून ठेवून विविध तारका समूह, अश्विनी, भरणी, कृतिका, रोहिणी, मृग, ओरायन, ध्रुव तारा कसा ओळखायचा या ची माहिती दिली. प्रतक्ष त्याचे स्थान दाखविले. हे तारका समुह लक्षात ठेवण्यासाठी आपण इंग्रजी वर्णमालेती अक्षरांचे आकार, भौमितिक आकार यांचा वापर करून सहज कसे लक्षात ठेऊ शकतो हे सांगितले. अशाप्रकारे आकाश निरीक्षणाची पर्वणीच विद्यार्थ्यांना मिळाली.आकाश दर्शनाचा लाभ चिखली, पालपेणे नं. १ , पालपेणे नं. 2 कौंढर काळसूर, अंजनवेल, गुहागर, पिंपर शाळेती १५२ विद्यार्थी , १५ शिक्षक आणि ३५ पालक यांनी घेतला.
याप्रसंगी जिल्हा शिक्षण आयाम प्रमुख मनोहर रामचंद्र पवार, प्रकल्प प्रमुख दिनेश काशिनाथ जाक्कर, डॉ. सन्मान बेलवलकर , प्रकल्प समिती सदस्य रामदास गीजे, प्रकल्प शिक्षक रविंद्र जयवंत खांडेकर आणि माजी विद्यार्थी आदी उपस्थित होते