तालुका ख. वि. संघाचा लाभांश सभासदांच्या बँक खात्यात होणार जमा

चेअरमन प्रमोद गावडे यांचा निर्णय

संघाची ६१ वी वार्षिक सभा ५ सप्टेंबर रोजी

सावंतवाडी । प्रतिनिधी : सावंतवाडी तालुका सहकारी खरेदी विक्री संघाच्या सभासदांना लाभांश वाटप बँकेच्या बचत खात्यात जमा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, अशी माहिती चेअरमन प्रमोद गावडे यांनी दिली.
सावंतवाडी तालुका सहकारी खरेदी विक्री संघाच्या सभासदांना लाभांश वाटप बँकेच्या बचत खात्यात जमा करण्याचा निर्णय मासिक बैठकीत घेण्यात आला. सभासद लाभांश जाहीर झाल्यानंतर घेऊन जात नाहीत त्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. त्यासाठी सभासदांनी बँक खात्याची झेरॉक्स प्रत कार्यालयात जमा करावी असे त्यांनी आवाहन केले.
तसेच ज्या सभासदांचे भाग अल्प रक्कमेचा आहे. त्यांनी किमान दोनशे रुपये गुंतवणूक करून भाग वाढवून घ्यावा. तो त्याही पेक्षा पटीने वाढवता येईल असे ते म्हणाले.

खरेदी विक्री संघाचे चेअरमन प्रमोद गावडे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. यावेळी उपाध्यक्ष रघुनाथ रेडकर, संचालक प्रवीण देसाई, प्रमोद सावंत,ज्ञानेश परब, प्रभाकर राऊळ, दत्ताराम हरमलकर, आत्माराम गावडे, शशिकांत गावडे, विनायक राऊळ, नारायण हिराप, दत्ताराम कोळमेकर, रक्ष्मी निर्गुण, अभिमन्यू लोंढे, गुरुनाथ पेडणेकर व व्यवस्थापक महेश परब आदी उपस्थित होते.
तालुक्यातील शेतकऱ्यांच्या उत्पादनाला बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करण्याचा निर्णय घेण्यात आला. या पार्श्वभूमीवर मळगाव व मळेवाड येथील संघाच्या शाखेत गावठी तांदूळ व नाचणी खरेदी करण्यास सुरुवात करण्यात आली आहे. या ठिकाणी गावठी उत्पादन खरेदी विक्री करण्यात येणार आहे. गावठी तांदूळ व नाचणी हवे असतील तर संपर्क साधावा असे आवाहन चेअरमन गावडे यांनी केले आहे.
सावंतवाडी तालुका खरेदी विक्री संघाची ६१ वी वार्षिक सभा येत्या दि.५ सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजता माठेवाडा येथे आयोजित करण्यात आली आहे, असे त्यांनी सांगितले.