मंडणगड येथे फासकीत अडकलेल्या बिबट्याला मिळाले जीवदान

मंडणगड | प्रतिनिधी : मंडणगड तालुक्यातील देव्हारे येथील काजूच्या बागेतील फासकीत सापडलेल्या बिबटयाला वनविभागाकडून जीवदान देण्यात आलं. दिनांक २९.१२.२०२२ रोजी सायंकाळी ४.३० वाजता श्री. अ.रा. दळवी, वनपाल मंडणगड यांना मौजे देव्हारे येथील स्थानिक नागिरिक श्री. श्रीधर खैरे यांनी मौजे देव्हारे आतले रस्त्यालगत असलेल्या काजू बागायतीमध्ये फासकीत बिबटया वन्यप्राणी अडकला असल्याची माहिती दिली. सदर माहितीच्या अनुषंगाने वनपाल मंडणगड, वनरक्षक देव्हारे यांनी तात्काळ घटनास्थळी जावून पाहणी केली असता मौजे देव्हारे – आतले रस्त्यालगत असलेल्या काजू बागायतीमध्ये दोन ते तीन वर्षांचा, नर जातीचा बिबटया वन्यप्राणी फासकीच्या तारेमध्ये अडकला असल्याचे दिसून आले. वनपाल मंडणगड यांनी याबाबतची माहिती श्री. वै.सा. बोराटे, परिक्षेत्र वन अधिकारी दापोली यांना दिली. त्यानंतर परिक्षेत्र वन अधिकारी दापोली, वनपाल दापोली, वनपाल खेड यांनी तात्काळ लोखंडी पिंजरा व वन्यप्राणी बचाव साहित्य घेवून घटनास्थळी दाखल झाले.

वन्यप्राणी बचाव पथकाने, लोखंडी पिंजरा लावून फासकीत अडकलेल्या बिबटया या वन्यप्राण्यास सुरक्षीत ताब्यात घेतले. त्यानंतर पिंजरासह बिबटयास खाजगी वाहनांमध्ये घेवून, मंडणगड येथे आणून मा. पशूधन विकास अधिकारी मंडणगड यांचे कडून विबटयाची वैद्यकीय तपासणी केली. सदरचा बिबटया हा वन्यप्राणी नैसर्गिक अधिवासात सोडणेस सूस्थितीत असल्याने, त्यास नैसर्गिक अधिवासात मुक्त करणेत आले. सदर प्रकरणी वनपाल मंडणगड यांनी अज्ञात व्यक्तीच्या विरूध्दात वन्यजीव (संरक्षण) अधिनियम १९७२ अन्वये गुन्हा नोंद केला आहे. सदर गुन्हे प्रकरणांचा पुढील तपास श्री. वैभव बोराटे, सहाय्यक वन्यजीव प्रतिपालक तथा परिक्षेत्र वन अधिकारी दापोली करीत आहेत.

सदरची कार्यवाही श्री. दिपक खाडे, विभागीय वन अधिकारी रत्नागिरी (चिपळूण), श्री. सचिन निलख सहाय्यक वनसंरक्षक (प्रा) रत्नागिरी (चिपळूण) यांचे मार्गदर्शनाखाली श्री. वैभव बोराटे, परिक्षेत्र वन अधिकारी दापोली, श्री. अ. रा. दळवी, वनपाल मंडणगड, श्री. सुरेश उपरे, वनपाल खेड, श्री.सा.स. सावंत, वनपाल दापोली तसेच वनरक्षक देव्हारे, पालघर यांनी पार पाडली आहे.

नागरिकांना याव्दारे आवाहन करणेत येते की, आपल्या आजूबाजूला वन्यजीव शिकार व तस्करी होत असल्यास जवळच्या वनविभागास किंवा १९२६ हॅलो फॉरेस्ट या हेल्पलाईन नंबर तात्काळ कळवावे. माहिती देणारेचे नाव गोपनीय ठेवून, माहिती देणाऱ्यास योग्य बक्षीस दिले जाईल याची नोंद घ्यावी..