सावंतवाडी । प्रतिनिधी : सावंतवाडी तालुक्यातील मळगांव गावचे रहिवासी व जेष्ठ वारकरी ह.भ.प. रविंद्रनाथ दिगंबर नाटेकर ( ७o, रा. रस्तावाडी, मळगांव ) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. गोवा बांबूळी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते. त्यातच रविवारी दुपारी १.४५ च्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली.
वै. ह.भ.प. दिगवर नाटेकर यांचे जेष्ठ पुत्र असलेल्या रविंद्रनाथ नाटेकर उर्फ रवि नाटेकर यांनी त्यांची वारकरी संप्रदायाची परंपरा कायम राखली होती. आषाढी, कार्तिकी, माघी व चैत्र या चारही वारी ते करायचे. मळगांव दशक्रोशीतील अनेक ग्रामस्थांना वारकरी संप्रदायात त्यांनी आणले होते. यातूनच त्यांनी अनेकजणांना व्यसनापासून परावृत्त केले होते. त्यांच्या मळगांव येथील निवासस्थानी नित्य पारायण चालायचे. हरि भक्तीची पताका त्यांनी दशक्रोशीत फडकवली होती.
अशा या विठ्ठल भक्ताचे आज एकादशी दिवशीच वैकुंठगमन झाले. त्यांच्या निधनाची माहिती कळताच मळगांव दशक्रोशीतील ग्रामस्थ व वारकरी यांनी त्यांच्या निवासस्थानी उपस्थित राहत त्यांच्या पार्थिवाचे दर्शन घेतले. सायंकाळी उशिरा मळगांव येथील स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
Sindhudurg