प्रतिनिधी | कणकवली :
कणकवली तालुका पत्रकार समितीच्यावतीने शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही निबंध स्पर्धा तीन गटांत होणार असून स्पर्धकांनी आपले निबंध ८ जानेवारीपर्यंत सादर करावयाचे आहेत.
तालुका पत्रकार समितीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. यात पाचवी ते सातवी या गटासाठी कोरोनातील दिवस व दप्तराचे ओझे हे दोन विषय देण्यात आले आहेत. आठवी ते दहावीच्या गटासाठी मी पत्रकार झालो तर आणि सोशल मीडिया – शाप की वरदान हे विषय देण्यात आले आहेत. तसेच अकरावी ते पंधरावीपर्यंतच्या महाविद्यालयीन गटासाठी भारताचा अमृत महोत्सव व लोकशाही आणि माध्यमांची जबाबदारी असे विषय निश्चित करण्यात आले आहेत.
या तीनही गटांसाठी अनुक्रमे पहिल्या तीन क्रमांकाना रोख रक्कम, स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे. स्पर्धेतील विजेत्यांना तालुका पत्रकार समितीच्यावतीने लवकरच आयोजित करण्यात येणाऱ्या पुरस्कार वितरण सोहळ्यात गौरविण्यात येणार आहे. इच्छूकांनी आपले निबंध दि. ८ जानेवारीपर्यंत अशोक करंबेळकर, कणकवली व मनिष ऑनलाईन सेंटर, पंचायत समितीजवळ, कणकवली (९४२२३८१९७७) येथे द्यावेत असे आवाहन तालुका पत्रकार समितीचे अध्यक्ष चंद्रशेखर देसाई, सचिव संजय राणे, खजिनदार नितीन कदम यांनी केले आहे.