Sangali : आश्रमशाळेतील १७० विद्यार्थ्यांना बासुंदीतून विषबाधा!

डोहाळे जेवणाच्या कार्यक्रमातील शिल्लक अन्न बाधले

सांगली : सांगलीमधील (Sangali) जत तालुक्यातील उमदी येथील आश्रमशाळेतील १७० विद्यार्थ्यांना बासुंदीतून विषबाधा झाली आहे.

जेवणानंतर या विद्यार्थ्यांना उलटी आणि मळमळीचा त्रास सुरू झाला होता. विषबाधा झालेल्या मुलांमध्ये पाच ते पंधरा वर्षांपर्यंतच्या वयोगटातील मुलांचा समावेश आहे. त्यानंतर त्यांना तातडीने माडग्याळमधील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. त्यामुळे सुदैवाने यामध्ये कोणतीही जिवीतहानी झाली नाही. परंतु अद्याप देखील ७९ विद्यार्थ्यांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या विद्यार्थ्यांची प्रकृती स्थिर आहे.

उमदी येथे विमुक्त आणि भटक्या जमातीतील प्रवर्गातील समता अनुदानित आश्रमशाळा चालवली जाते. जवळपास दोनशेच्या आसपास विद्यार्थी या शाळेमध्ये आहेत. यावेळी या विद्यार्थ्यांना एका डोहाळे जेवणाच्या कार्यक्रमातील शिल्लक अन्न दिले गेले. त्यामध्ये बासुंदी होती. त्यामुळे आश्रमशाळेतील १७० विद्यार्थ्यांना बासुंदीतून विषबाधा झाली.

दरम्यान, समाज कल्याण विभागाच्या सहाय्यक आयुक्तांनी या घटनेचे गांभीर्य़ लक्षात घेत तात्काळ या प्रकरणाची दखल घेतली आहे. तसेच संपूर्ण घटनेची चौकशी करून २४ तासाच्या आत अहवाल सादर करण्याची आणि दोषींवर कारवाई करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी दिल्या आहेत.