पोलिओ निर्मूलनासाठी रोटरी क्लबचा पुढाकार- डिस्ट्रीक्ट गव्हर्नर व्यंकटेश देशपांडे*

Google search engine
Google search engine

रत्नागिरी : जगभरात पोलिओ निर्मूलनासाठी रोटरी क्लबने सिंहाचा वाटा उचलला आहे. भारतातून पोलिओचे निर्मूलन झाले असले तरी गाफील राहता कामा नये. आपली पिढी सुदृढ होण्याकरिता हा प्रकल्प चालू राहणार आहे, असे प्रतिपादन रोटरी क्लबचे डिस्ट्रीक्ट गव्हर्नर व्यंकटेश देशपांडे यांनी केले. युवा पिढीचे अपघात रोखण्यासाठीही मार्गदर्शन कार्यक्रम, आणि मुलांना व्यसनाधीनतेतून बाहेर काढून त्यांचे पुनर्वसन करण्यासाठी प्रयत्न करावेत, अशी सूचनाही त्यांनी केली.

रोटरी क्लबचे डिस्ट्रीक्ट गव्हर्नर व्यंकटेश देशपांडे यांनी बुधवारी २८ डिसेंबरला रत्नागिरी रोटरी क्लबला भेट दिली. हॉटेल लॅंडमार्क येथे बोर्ड मिटिंग झाली. याप्रसंगी रोटरी क्लब ऑफ रत्नागिरीचे अध्यक्ष राजेंद्र घाग, सचिव रूपेश पेडणेकर, खजिनदार प्रकल्प आराध्ये, असिस्टंट गव्हर्नर नीलेश मुळ्ये, ज्येष्ठ सदस्य धरमसीभाई चौहान, नमिता कीर, विनायक हातखंबकर, माधुरी कळंबटे, माजी अध्यक्ष, पदाधिकारी, सदस्य उपस्थित होते. या उपक्रमासाठी रत्नागिरीतून आज २०० डॉलरचे सहकार्य लाभले आहे. माळनाका येथे रोटरीच्या चौकातील आयलॅंडला एंड पोलिओ नाऊ असा संदेश देणाऱ्या फलकाचे अनावरण श्री. देशपांडे यांच्या हस्ते करण्यात आले.

या वेळी श्री. देशपांडे यांनी सांगितले की, पोलिओ निर्मूलन प्रकल्प रोटरी क्लब १९८७ पासून राबवत आहे. याकरिता जगभरातून निधी रोटरी क्लब उभा करत आहे. अफगाणिस्तान, पाकिस्तान येथे पोलिओचे रुग्ण सापडले आहेत. अमेरिकेतही पोलिओचा रुग्ण ५० वर्षांनी सापडल्याने खळबळ उडाली. भारतात असे रुग्ण आढळू नयेत, याकरिता अजूनही काम करण्याची गरज आहे.

रोटरी क्लबतर्फे समाजासाठी सातत्यपूर्ण योगदान देणाऱ्या नर्स, पोस्टमन आदींना रोटरी व्होकेशनल सर्व्हिस अवॉर्ड द्यावे. त्यातून त्यांनाही प्रोत्साहन, प्रेरणा मिळेल. व्होकेशनल एक्सलन्स अवॉर्ड, करिअर गाइडन्स कार्यक्रम, ट्रेड फेअर, व्होकेशनल व्हॉलेंटिअर्स, कम्युनिटी सर्व्हिस, रोटरी फ्रेंडशिप एक्स्चेंज प्रोग्राम, इंटरनॅशनल युथ एक्स्चेंज, पीस स्कॉलर्स, टॅलेंट सर्च, असे उपक्रम राबवण्याबाबत व्यंकटेश देशपांडे यांनी सविस्तर मार्गदर्शन केले.

अध्यक्ष राजेंद्र घाग यांनी रोटरी क्लबच्या गेल्या सहा महिन्यांतील कार्याचा आढावा घेताना पुढील सहा महिन्यात अधिक उपक्रम राबवण्यात येणार असल्याचे सांगितले. तसेच जिल्हा शासकीय रुग्णालयात रोटरी क्लबतर्फे होणाऱ्या कायमस्वरूपी प्रकल्पाअंतर्गत बालकांसाठीच्या अतिदक्षता विभागासंदर्भात माहिती दिली. या विभाग उभारणीसाठी श्री. देशपांडे यांनी मोठे सहकार्य, मार्गदर्शन केल्याचे ते म्हणाले.