साडे अडतीस लाखाची दारू जप्त ; राज्य उत्पादन शुल्क कणकवली विभागाची कारवाई

 

कणकवली : मुंबई – गोवा महामार्गावर कासार्डे पेट्रोलपंपासमोर राज्य उत्पादन शुल्क विभागाच्यावतीने गोवा बनावटीचे विदेशी मद्याचे ४०० बॉक्स जप्त करण्यात आले आहेत. या विदेशी मद्याची अंदाजे किंमत ३८ लाख ४० हजार रुपये असून वाहतूक करणाऱ्या ट्रकची किंमत १० लाख इतकी आहे. असा एकूण ४८ लाख ४० हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

नववर्षाच्या पार्श्वभूमीवर गोवा राज्यातून महाराष्ट्रात बेकायदेशीर मद्याची वाहतूक मोठया प्रमाणात होत असल्याचे सध्याचे चित्र आहे. त्यामुळे २९ डिसेंबर रोजी सकाळी ९ : ३० वाजण्याच्या सुमारास कणकवली तालुक्यातील कासार्डे, पेट्रोलपंपासमोर मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग क्र. ६६ वर राज्य उत्पादन शुल्क विभागाच्यावतीने वाहन तपासणी करण्यात येत होती. यावेळी एका मल्टी एक्सल (ओपन बॉडी) बाराचाकी ट्रक ( क्रमांक आर. जे. – ०४ – जी.ए. – ५४१३ ) थांबवून ट्रकला लावलेली ताडपत्री उघडून तपासणी करण्यात आली. त्यामध्ये गोवा राज्यनिर्मित अवैध विदेशी मद्याचे ४०० बॉक्स आढळून आले ते जप्त करण्यात आले. या विदेशी मद्याची अंदाजे किंमत ३८लाख ४०,००० रुपये असून ट्रकची किंमत १० लाख इतकी आहे. हा ४८ लाख ४०,००० रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या कंटेनरचा चालक संशयित आरोपी हुकमाराम भेरा राम (४२, रा. लाभुका तला खडीन, राजस्थान) याला अवैध दारू वाहतूक प्रकरणी पुढील कारवाईसाठी ताब्यात घेण्यात आलेले आहे.

सदर कारवाई राज्य उत्पादन शुल्क विभागाचे सिंधुदुर्ग अधीक्षक डॉ. बी. एच. तडवी यांच्या प्रत्यक्ष मार्गदर्शनानुसार निरीक्षक प्रभात सावंत, दुय्यम निरीक्षक संतोष पाटील व जे. एस. मानेमोड, सहाय्यक दुय्यम निरीक्षक सुरज चौधरी, महिला जवान स्नेहल कुवेसकर, जगन चव्हाण, वाहनचालक, मदतनीस खान, शहा यांनी केली. या गुन्हयाचा पुढील तपास कणकवली दुय्यम निरीक्षक संतोष पाटील करीत आहेत.