गुहागर | प्रतिनिधी : समाजव्यवस्था जर चांगल्या प्रकारची तयार करायची असेल तर महिला सक्षमीकरणाचया दृष्टीने पाऊल पुढे टाकणे गरजेचे असल्याचे मत नगराध्यक्ष राजेश बेंडल यांनी व्यक्त केले. महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत तालुका अभियान कक्ष गुहागर आणि पंचायत समिती गुहागर मार्फत तालुक्यातील स्वयंसाह्यता समुहातील महिलांनी उत्पादित केलेल्या उत्पादनांच्या विक्री व प्रदर्शनासाठी गुहागर सरस महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.
यावेळी गटविकास अधिकारी प्रशांत राऊत,नायब तहसीलदार अतुल प्रभूदेसाई, तालुका कृषी अधिकारी अमोल क्षीरसागर, कृषी अधिकारी आर.के.धायगुडे, तालुका अभिमान व्यवस्थापक दुर्वा ओक, पत्रकार गणेश किर्वे, नगरपंचयत सदस्य , पोलीस निरीक्षक तुषार पाचपुते, जिल्हा अभियान व्यवस्थापक आयात पिरजादे, उपस्थित होते.
हा महोत्सव तहसील कार्यालय मागे पोलीस परेड मैदान येथे ३१ डिसेंबर पर्यंत सुरू राहणार आहे.
बेंडल पुढे म्हणाले की गुहागर शहरांतील तसेच तालुक्यातील बचत गट हे चांगल्या प्रकारे काम करत असल्याबद्दल कौतुकास्पद उद्गार काढून बॅंका सुद्धा या बचत
गटांना कर्ज देण्यास उत्सुक असतात. कारण या बचत गटाच्या महिलांकडून कर्जफेड योग्य रीतीने होत असते.
यावेळी गट विकास अधिकारी प्रशांत राऊत यांनीही बचत समुहाच्या उत्पादनाच्या विक्रीव्यवस्थेसाठी अशा प्रकारचे प्रदर्शन व महोत्सव आवश्यक आहेत,असे प्रतिपादन केले.
या महोत्सवात सद्गुरू कृपा, सावित्रीबाई फुले ,श्री हरेश्वर, जयहनुमान, आदर्श महिला बचत गट अशा विविध बचत समुहानी स्टॉल लावले आहेत.
या प्रदर्शनामध्ये गुहागर तालुक्यातील ग्रामपंचायती स्वयंसहाय्यता बचत समुहाचे एकूण २७ विविध प्रकारच्या उत्पादनांचे व १० जेवणाचे स्टाँल असे एकूण ३७ स्टाॅल उपलब्ध आहेत











