रुपेश वाईकर | दापोली : सलग आलेल्या सुट्टयामुळे कोकणात हजारो संख्येने पर्यटक दाखल झाले आहेत. दापोली तालुका हा मिनी महाबळेश्वर समजला जातो. पुणे, मुंबई, सातारा, सांगली, कोल्हापूर येथील पर्यटक हे दापोलीला पसंती देतात.कोकणी खाद्य, निसर्ग यांच्या साथीने नाताळच्या सुट्टीसाठी आणि नव वर्षाच्या स्वागताकरिता पर्यटकांनी खास कोकणची निवड केली आहे. यावर्षीही देखील दापोली हाऊसफुल्ल झाला आहे. पर्यटकांना येथील स्वच्छ समुद्र किनारे व ताजी मच्छी हे फार आकर्षक आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील दोन नंबरचे समजले जाणारे हर्णे बंदरावर मासळी खरेदीसाठी पर्यटकांची एकच गर्दी झाल्याने ताज्या मासळीचे दर चांगलेच कडाडले आहेत. दररोज गरजेपुरती मासळी विकत घेणाऱ्या स्थानिक खवय्यांना मात्र चढया दरातील मासे विकत घेणे परवडत नाही.
सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी आणि नव्या वर्षाच्या स्वागतासाठी दापोलीतील दाभोळपासून केळशीपर्यंतच्या सर्वच समुद्र किनारपट्टयांवर पर्यटक मोठया संख्येने दाखल झाले आहेत. याआधी शनिवार रविवार अथवा जोडून शासकीय आस्थापनांच्या सुट्टया आल्या की दापोलीतील समुद्र किनाऱ्यावर पर्यटकांची गर्दी होते. नाताळपासूनच येथील समुद्र किनारपट्टीवर पर्यटक मोठया संख्येने दाखल झाल्याने आधीच पर्यटकांची समुद्र किनारपट्टयांवरील वाढलेली गर्दी असताना त्यातच नव्या वर्षाच्या एक दिवस आधीच दापोलीत मोठया संख्येने पर्यटक दाखल झाले आहेत. हर्णे मच्छिमारी बंदरावर मासळी खरेदीसाठी पर्यटकांनी शुक्रवारी एकच झुंबड उडाली आहे.यावर्षी नववर्षांच स्वागत कोकणात करावं याच बेतानं सध्या कोकण पर्यटकांनी हाऊसफुल झालंय. एमटीडीसीची सर्व रिसॉर्ट आणि हॉटेल्सची आरक्षण जानेवारीच्या पहील्या आठवड्यापर्यंत फुल झालीयत.
कोकणाला ७२० किलोमीटरचा विस्तीर्ण असा समुद्र किनारा लाभलाय. निसर्गरम्य हिरवाई पर्य़टकांना खुणावतेय यावर्षी पर्यटकांना कोकणला जास्त पसंती दिलीय. तर सध्या कोकणातले अनेक समुद्रकिनारी पर्यटकांनी फुलून गेलेत. वॉटर स्पोर्ट्स, उंट, पँराशुट अशात सध्या अनेक पर्यटक गुंतलेत. समुद्राच्या पाण्यात भिजण्याची मज्जा अनेक पर्यटक घेताना दिसत आहेत.दापोली तालूक्यातील दाभोळ ते केळशी या समुद्रकिनारपट्टीतील समुद्रमार्गे जवळपास 35 किमी अंतरातील दाभोळ, कोळथरे, बुरोंडी, तामसतीर्थ, लाडघर,कर्दे, मुरूड, सालदुरे, पाळंदे, हर्णे, पाजपंढरी, आंजर्ले, पाडले, आडे आणि केळशी येथील सर्वच स्वच्छ सुंदर किनारपट्टयांवर सरत्या वर्षातील मावळतीकडे जाणाऱ्या सुर्यास्ताचे प्रतिबिंब पाहण्यासाठी आणि नव्या वर्षाच्या स्वागतासाठी पर्यटक मोठया संख्येने दाखल झाले आहेत. वाढत्या पर्यटकांच्या संख्येमुळे होत असलेल्या व्यवसायामुळे दापोलीतील समुद्र किनारपट्टीशिवाय तालूक्यातील अन्य ठिकाणचे पर्यटन व्यवसायिकही चांगलेच सुखावलेले आहेत. असे असले तरी येथील समुद्र किनारपट्टयांवर जाणारे अरूंद तसेच खड्डेमय रस्ते त्यामुळे होणारी वाहनांची वाहतुक कोंडी पाहता याचा अधिकचा ताण हा येथील पोलिस प्रशासनावर पडला आहे.