द् पॉवर ऑफ मिडीया फाऊंडेशनचा पत्रकार भूषण पुरस्कार जमीर खलपे, पत्रकार सन्मान पुरस्कार सिध्देश मराठे यांना जाहीर

Google search engine
Google search engine

पत्रकार दिनी ६ जानेवारी रोजी होणार वितरण

रत्नागिरी | प्रतिनिधी : द पॉवर ऑफ मिडीया फाऊंडेशन दक्षिण रत्नागिरी जिल्ह्याच्या वतीने पत्रकार सन्मान पुरस्कार दैनिक फ्रेश न्यूजचे सिध्देश मराठे आणि पत्रकार भुषण पुरस्कार दैनिक रत्नागिरी एक्स्प्रेसचे जमीर खलपे यांना जाहीर झाला आहे. या पुरस्कारांचे वितरण पत्रकार दिनी ६ जानेवारी रोजी सकाळी ११ वाजता मराठा मंदिर अ. के. देसाई हायस्कूल येथे होणार आहे. तसेच पत्रकार दिन व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती द पॉवर ऑफ मिडीया फाऊंडेशनचे दक्षिण रत्नागिरी जिल्हाध्यक्ष दुर्गेश आखाडे यांनी सांगितले.द पॉवर ऑफ मिडीया फाऊंडेशन दक्षिण रत्नागिरी जिल्ह्याच्या वतीने दरवर्षी पत्रकारितेच्या क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या पत्रकारांचा गौरव केला जातो. यंदाचा पत्रकार भुषण पुरस्कार जमीर खलपे यांना जाहीर झाला आहे. सडेतोड पत्रकारितेबरोबरच जमीर खलपे यांचे सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य आहे. संपर्क युनिक फाऊंडेशनच्या माध्यमातून ते सामाजिक चळवळ राबवतात. अनेक गोरगरीब रुग्णांसाठी जमीर खलपे आरोग्यदुत म्हणून काम करतात. यंदाचा पत्रकार सन्मान पुरस्कार सिद्धेश मराठे यांना जाहीर झाला आहे. आक्रमक पत्रकारितेतून अल्पावधीत रत्नागिरीच्या पत्रकारिता क्षेत्रात सिध्देश मराठे यांनी ठसा उमटवला आहे. त्याचबरोबर राजापूर तालुक्यातील शिवणे खुर्द ग्रामपंचायतीचे सदस्यपद भुषवताना ग्रामीण भागात सामाजिक आणि विकासात्मक कामे केली आहेत.

बातम्या का वाचाव्यात ? स्पर्धा परिक्षेच्या दृष्टीने व्याख्यानमाला
द पॉवर ऑफ मिडीया फाऊंडेशनने यंदाच्या वर्षापासून पत्रकारितेतील व्याख्यानमाला सुरु केली आहे. बातम्या का वाचाव्यात? स्पर्धा परीक्षेच्या दृष्टीने या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे. रत्नागिरीचे तहसिलदार शशिकांत जाधव यांचे व्याख्यान होणार आहे. शुक्रवार दि. ६ जानेवारी रोजी सकाळी ११ वाजता मराठा मंदिर अ. के. देसाई हायस्कूल येथे आणि शनिवार दि. ७ जानेवारी रोजी सकाळी ११ वाजता रंजन मंदिर, रा. भा. शिर्के प्रशाला येथे व्याख्यान होणार आहे. यावेळी रा. भा. शिर्के प्रशालेचे मुख्याध्यापक रमेश चव्हाण आणि अ. के. देसाई हायस्कूलचे वरिष्ठ शिक्षक विनोद गावखडकर उपस्थित राहणार आहेत.