तळवडे येथील व्याख्यानात विद्यार्थ्याना मौलिक सल्ला
सावंतवाडी । प्रतिनिधी : विद्यार्थी दशेत असताना विद्यार्थ्यांनी आपल्याला ज्या क्षेत्रात आवड आहे त्या क्षेत्रासाठी आपल्या क्षमता नेमक्या कशा आहेत याचे अवलोकन करणे गरजेचे आहे. आपल्या क्षमता ओळखून करिअर निवडल्यास निश्चितच यशाला गवसणी घालता येते, असे प्रतिपादन सुप्रसिद्ध व्याख्याते प्रा. रुपेश पाटील यांनी केले.
तळवडे येथील जनता विद्यालयात ‘दहावी व बारावीनंतर करिअर’ या विषयावर प्रा. रुपेश पाटील यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. मान्यवरांच्या हस्ते सरस्वती मातेचे पूजन व दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाचा शुभारंभ झाला. यावेळी अध्यक्षस्थानी विद्यालयाचे प्राचार्य प्रतापराव देसाई तर पर्यवेक्षक दयानंद बांगर, किशोर नांदिवडेकर, प्रा. अदिती सामंत आदी उपस्थित होते.
आपल्या व्याख्यानात प्रा. पाटील पुढे म्हणाले की अलीकडे विद्यार्थी आपल्या करिअर बाबत खूप चिंता करत असतात. स्पर्धेच्या युगात माझा निभाव लागेल का असा प्रश्न अनेकदा विद्यार्थ्यांना सतावत असतो. अशा वेळी कुणीतरी आपल्याला सांगेल आणि मग आपण त्या क्षेत्रात जाऊन आपले करिअर करू या मनस्थितीत असलेल्या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना आपल्या स्वतःच्या क्षमता ओळखणे आज क्रमप्राप्त झाले आहे. शहरी भागातील विद्यार्थी आणि पालक सजग आहेत. त्या प्रमाणात ग्रामीण भागातील विद्यार्थी आणि पालक अजूनही आपल्या करिअरबाबत चिंताग्रस्त दिसतात. विद्यार्थ्यांनी आपल्याला ज्या क्षेत्रात आवड आहे, त्या क्षेत्रातील क्षमता वृद्धिंगत कराव्यात. आपल्या अभिरुचीनुसार योग्य करिअर निवडल्यास आणि सातत्यपूर्ण प्रामाणिक प्रयत्न केल्यास यश निश्चित मिळते, असेही प्रा. पाटील यांनी सांगितले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य पी. के. देसाई यांनी केले. यावेळी त्यांनी व्याख्यानमालेचा विद्यार्थ्यांसाठी आणि त्यांच्या भविष्यातील करिअर बाबतीत त्यांना योग्य मार्गदर्शन व्हावे, या उदात्त हेतूने आयोजन करीत असल्याचे स्पष्ट केले. सूत्रसंचालन सहाय्यक शिक्षक चौरे यांनी केले तर आभार प्रदर्शन ज्येष्ठ शिक्षक दयानंद बांगर यांनी केले.
Sindhudurg