अखिल भारतीय ग्राहक पंचायतीचे राष्ट्रीय अध्यक्ष नारायणभाई शहा यांचे प्रतिपादन
गुहागर | प्रतिनिधी : ग्राहकांसाठी 2019 चा कायदा एक शस्त्र असून त्याचा ग्राहकांनी प्रत्येक ठिकाणी उपयोग करून होणारी फसवणूक थांबवावी, असे आवाहन अखिल भारतीय ग्राहक पंचायतीचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री. नारायणभाई शहा यांनी केले. जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या राष्ट्रीय ग्राहक दिनाच्या कार्यक्रमात ते बोलत होते.
सुरुवातीला मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. यावेळी राष्ट्रीय राष्ट्रीय संघटन मंत्री श्री. दिनकर सबनीस यांनी ग्राहक जागृत होणे अत्यंत महत्त्वाचे असून विविध फसव्या जाहिराती फॅशन, मार्केटिंग शैक्षणिक संस्था यामध्ये जागरूकता असावी असे प्रतिपादन केले. राष्ट्रीय कार्यकारणी सहसचिव सौ. नेहा जोशी यांनी ग्राहक चळवळ ही लोकाभिमुख व्हावी अशी अपेक्षा व्यक्त केली.
अप्पर जिल्हाधिकारी सौ. सुनंदा साठे यांनी ग्राहक पंचायतीच्या कामाचे कौतुक केले. अत्यंत पारदर्शक आणि निःस्वार्थी काम करणारे कार्यकर्ते या संघटनेत असून भविष्यात जिल्हा कार्यालय व आपण मिळून ही चळवळ समाजाच्या प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोहोचूया, असे आवाहन त्यांनी केले.या कार्यक्रमासाठी विविध कार्यालयाचे अधिकारी, राष्ट्रीय सचिव श्री. जयंतीभाई कथारिया, राष्ट्रीय कार्यकारीणी सदस्य श्री. विजय भागवत, कोकण प्रांत अध्यक्ष चंद्रकांत झगडे, सचिव श्री. मानसिंग यादव, कोषाध्यक्ष सौ. वेदा प्रभुदेसाई, रत्नागिरी जिल्हाध्यक्ष चंद्रकांत मांडवकर, महिला जागरण प्रांतच्या प्रणिता धामणस्कर, जिल्हा कार्यकारिणी सह सचिव निलेश गोयथळे, आनंद ओक, प्रांत संघटक सुकांत चक्रदेव, गुहागर तालुकाध्यक्ष गणेश धनावडे, जिल्हा पुरवठा अधिकारी सौ. रोहिणी रजपूत आदी उपस्थित होते.रत्नागिरी येथे प्रथमच राष्ट्रीय कार्यकारिणीची सभा झाली. या सभेला देशातील ३७ प्रांतातून राष्ट्रीय स्तरावरील ग्राहक पंचायतीचे सर्व कार्यकर्ते उपस्थित होते.