कुडाळ | प्रतिनिधी : सांस्कृतिक क्षेत्रातील बाबा वर्दम थिएटर्स तर्फे बाबा वर्दम रंगमंच, सांस्कृतिक भवन, कुडाळ हायस्कूल कुडाळ येथे बुधवार दि. ०४ जानेवारी रोजी संध्याकाळी ६.३० वा. विद्याधरांचे नाट्यवैभव हा कै. विद्याधर गोखले यांच्या नाट्यगीतांवर आधारीत कार्यक्रम सादर होणार असल्याची माहिती पत्रकार परिषदेत बाबा वर्दम थिएटर्सचे कार्यवाह केदार सामंत यांनी दिली.
संत राऊळ महाराज महाविद्यालयात या पत्रकार परिषदेवेळी बाबा वर्दम थिएटर्सचे माजी अध्यक्ष आनंद वैद्य उपस्थित होते. यावेळी केदार सामंत यांनी सांगितले की, नाटककार विद्याधर गोखले यांचे जन्मशताब्दी वर्ष दि. ४ जानेवारी पासून सुरु होत आहे. त्या निमीत्त विद्याधर गोखले संगीत नाट्य प्रतिष्ठान तर्फे वर्षभर नाटक आणि संगीताशी निगडीत विविध कार्यक्रम आयोजीत केले जाणार आहेत. विद्याधर गोखले यांच्या कन्या शुभदा दादरकर यांच्या संकल्पनेतून महाराष्ट्र व गोव्यातील १० नामवंत आणि निवडक संस्था या जन्मशताब्दी वर्षाच्या शुभारंभ कार्यक्रम सादर करणार आहेत.
चौकड-
विद्याधर गोखले यांचे कुडाळ विशेष नाते – केदार सामंत
विद्याधर गोखले आणि कुडाळ यांचे नाते सांगायचे झाले तर विद्याधर गोखले यांच्या अनेक नाटकांचे संगीत दिग्दर्शन कुडाळ चे सुपुत्र सुप्रसिध्द संगीतकार के. वसंत देसाई यांचे आहे. तर रंगभूषा कुडाळचेच दूसरे सुपुत्र रंगभूषा महर्षी कै. बाबा वर्दम यांनी केलेली आहे अशी माहिती सामंत यांनी दिली. बाबा वर्दम थिएटर्स आयोजित हा कार्यक्रम सर्व रसिकांसाठी खुला असून सर्व नाट्य संगीत प्रेमीनी या कार्यक्रमास उपस्थित रहावे असे आवाहन बाबा वर्दम थिएटर्स. कुडाळ चे अध्यक्ष विलास कुडाळकर यांनी केले आहे.