गावखेड्यातील लोककलावंतांना ‘राजाश्रय’ देणार : युवराज लखमराजे भोंसले

सावंतवाडी राजवाड्यात ५ ते ८ जानेवारीला ‘लोककला महोत्सव’

महोत्सवाच्या माध्यमातून उपेक्षित कलाकारांना व्यासपीठ देण्याचा प्रयत्न

सावंतवाडी । प्रतिनिधी : कोकणच्या गावागावांत लोककला दडली आहे. मात्र, आजच्या नव्या पिढीला या कलेची म्हणावी तशी जाण राहिली नाही. माझं शिक्षणही परदेशात झालं. त्यामुळे मलाही या कला जाणून घेऊन नव्या पिढीसमोर त्या आणायच्या आहेत. पुण्यश्लोक बापूसाहेब महाराज व श्रीमंत शिवरामराजे भोंसले यांच्या काळात अनेक कलावंत राजवाड्यावर यायचे. त्याचप्रमाणे पुन्हा एकदा अशा कलावंतांना राजाश्रय देण्याचा माझा प्रयत्न आहे. तसेच लोककलेतील अशा उपेक्षित उपासकांना न्याय मिळवून देण्यासाठी त्यांच्या उत्कर्षासाठी मंत्रालय स्तरावरून पाठपुरावा करून शासन स्तरावरून त्यांना सर्वतोपरी मदत करण्याचा आपला मानस आहे, अशी भूमिका श्री पंचम खेमराज महाविद्यालयाचे
कार्यकारी विश्वस्त युवराज लखमराजे सावंत भोंसले यांनी व्यक्त केला.

युवराज लखमराजे सावंत भोंसले यांच्या संकल्पनेतून सावंतवाडीच्या संस्थानकलीन राजवाड्यात श्री पंचम खेमराज महाविद्यालयाच्या माध्यमातून ५ ते ८ जानेवारी या कालावधीत दशावतारी लोककला महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. दिलीप भारमल, प्रा. दिलीप गोडकर, डॉ. उत्तम देठे, डॉ. गणेश मर्गज, डॉ. बी.एन. हिरामणी, डॉ. डी.जी. बोर्डे, डॉ. संदीप पाटील, प्रा. सुधीर बुवा, आदी उपस्थित होते.

राजवाडा येथे होणाऱ्या या लोककला महोत्सवात जिल्ह्यातील सात पारंपरिक दशावतार नाट्यमंडळाचे नाट्यप्रयोग होणार आहेत. दररोज दोन नाट्यप्रयोग होणार असून ८ जानेवारीला समारोप होणार आहे. सायंकाळी ६.३० वाजता पहिला नाट्यप्रयोग, त्यानंतर रात्री ८.३० वाजता दुसरा प्रयोग होणार आहे. ५ जानेवारी रोजी सायंकाळी ६ वाजता लोककला महोत्सवाचे उद्घाटन होणार आहे.५ जानेवारीला सायंकाळी ६.३० ते रात्री ८ या वेळेत चेंदवणकर दशावतार नाट्यमंडळ, चेंदवण यांचा ‘गौरी स्वयंवर’ हा नाट्यप्रयोग, त्यानंतर रात्री ८.३० ते १० या वेळेत वालावलकर दशावतार नाट्यमंडळ, ओसरगाव यांचा ‘वेध राहुचे ग्रहण चंद्र सूर्याची’ हा नाट्यप्रयोग होणार आहे. ६ रोजी सायंकाळी ६.३० ते ८ या वेळेत कलेश्वर दशावतार नाट्य मंडळ, नेरुर यांचा ‘कर्ण पिशाच्च अर्थात अर्धसत्य’ हा नाट्यप्रयोग, त्यानंतर रात्री ८.३० ते १० या वेळेत खानोलकर दशावतार नाट्य मंडळ (खानोली) यांचा पालीचा बल्लाळेश्वर’ हा नाट्यप्रयोग होणार आहे.७ जानेवारीला सायंकाळी ६.३० ते ८ या वेळेत दत माऊली दशावतार नाट्य मंडळ, सिंधुदुर्ग यांचा ‘शेषात्मज गणेश’ नाट्यप्रयोग, रात्री ८.३० वाजता महापुरुष दशावतार नाट्यमंडळ, सावंतवाडी यांचा ‘प्रलंयकारी गणेश’ नाट्यप्रयोग होणार आहे. हा ८ जानेवारीला सायंकाळी ६.३० ते ८ या वेळेत नाईक मोचेमाडकर दशावतार नाट्यमंडळ, मोचेमाड यांचा ‘बहुवर्मा पुत्रप्राप्ती’ हा नाट्यप्रयोग होणार आहे. त्यानंतर महोत्सवाचा समारोप होणार आहे.

पारंपरिक दशावतार कला जिवंत ठेवण्यासाठी, तिचे जतन, कला वृद्धींगत करण्यासाठी तसेच आजचा तरुण वर्ग या कलेकडे आकर्षित व्हावा, या उद्देशानं सिंधुदुर्ग जिल्हा शिक्षण प्रसारक मंडळ, श्री पंचम खेमराज महाविद्यालयाच्या माध्यमातून लोककला महोत्सवाच आयोजन करण्यात आले आहे असं मत सिंधुदुर्ग जिल्हा शिक्षण प्रसारक मंडळाचे श्री पंचम खेमराज महाविद्यालय आणि संस्थेचे कार्यकारी विश्वस्त युवराज लखमराजे सावंत-भोंसले यांनी व्यक्त केले.