सावंतवाडी । प्रतिनिधी :
सावंतवाडी एज्युकेशन सोसायटी संचलित कळसुलकर इंग्लिश स्कूल व आय. बी. सय्यद कनिष्ठ महाविद्यालय, सावंतवाडीच्या कळसुलकर हायस्कूलची ९ वी ची विद्यार्थिनी सार्जंट स्वरांगी खानोलकर हिची नवी दिल्ली येथे होणाऱ्या राष्ट्रीय छात्रसेनेच्या मुख्य गणतंत्र दिवस परेडमध्ये निवड झाली आहे. स्वरांगी ही सिंधुदुर्ग जिल्ह्यातून पहिलीच माध्यमिक शाळेची विद्यार्थिनी म्हणून तिला मान मिळाला आहे.
स्वरांगी हिला ५८ महाराष्ट्र एन.सी.सी. बटालियनचे कमांडिंग ऑफिसर कर्नल दिपक दयाळ आणि प्रशासकीय अधिकारी कर्नल निलेश पाथरकर यांचे बहुमोल सहकार्य लाभले.तिच्या या कामगिरीने कळसुलकर इंग्लिश स्कूलच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला आहे. या तिच्या यशाबद्दल तिचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.
स्वरांगी ही इयत्ता नववी मध्ये शिक्षण घेत असून तिला लहानपणापासून नृत्य आणि सैनिकी प्रशिक्षणाची आवड होती तिने इयत्ता आठवी मध्ये असताना राष्ट्रीय छात्र सेनेच्या पथकात दाखल होण्याची तयारी केली व निवड प्रक्रियेत पास झाली. त्या अनुषंगाने कळसुलकर इंग्लिश स्कूलच्या एनसीसी पथकामध्ये तिची निवड झाली. पुढे तिने ५८ एनसीसी महाराष्ट्र बटालियन सिंधुदुर्ग नगरी ओरोस येथे गणतंत्र दिवस संचलन शिबिराच्या निवड चाचण्या पास केल्यानंतर तिची कोल्हापूर विभागीय स्पर्धेसाठी निवड झाली. पुढे तिने एक ना एक म्हणत सर्व टप्पे पार केले व अंतिम पुणे येथे पार पडलेल्या प्री आर डी सी मध्ये आपले अव्वल स्थान राखत मुख्य गणतंत्र दिवस शिबिरामध्ये सहभागी होण्याचे स्वप्न साकारले.
विशेष म्हणजे पहिल्यांदाच महाराष्ट्र डायरेक्टरेटचे विद्यार्थी विमानाने हवाई वाहतुकीने दिल्ली येथे महाराष्ट्र सरकारच्या वतीने पाठवण्यात आले. तोही मान स्वरांगीला मिळाला सिंधुदुर्ग रत्नागिरी जिल्ह्यातून पहिलीच विद्यार्थिनी सिंधू कन्या दिल्लीमध्ये होणाऱ्या संचलनात सहभागी होत आहे. ५८ एनसीसी बटालियनचे कमांडिंग ऑफिसर कर्नल दीपक दयाल, प्रशासकीय अधिकारी अडम, ऑफिसर कर्नल निलेश पाथरकर यांच्या सहकार्याने सुभेदार मेजर दिनेश गेडाम व फर्स्ट ऑफिसर गोपाळ गवस कळसुलकर इंग्लिश स्कूल सावंतवाडी यांच्या मार्गदर्शनाखाली हा पल्ला गाठण्यात स्वरांगीला यश प्राप्त झाले.
या सर्वांमध्ये सावंतवाडी एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष शैलेश पै सर्व संचालक मंडळ कासूलकर इंग्लिश स्कूल व आयबी सय्यद कनिष्ठ महाविद्यालय चे प्राचार्य नारायण मानकर सर सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी वृंद पालक वर्ग त्याचप्रमाणे स्वरांगीची आई स्वप्नजा खानोलकर वडील संदीप खानोलकर यांचे मोलाचे सहकार्य लाभले. राष्ट्रीय स्तरावर दिल्ली येथे होणाऱ्या स्पर्धांमध्येही तिला चांगले यश मिळू दे अशा शुभेच्छा तिला देण्यात आल्या आहेत.
दरम्यान, कु. स्वरांगी खानोलकर हिला शास्त्रीय नृत्याची ४ लाखाची बिटी एस स्कॉलरशिप देखील प्राप्त झाली आहे.
झी एंटरटेनमेंट एंटरप्रायझेस लिमिटेड आणि गीव्ह इंडिया फऊंडेशन यांच्या मार्फत संपूर्ण भारतात विविध कलांसाठी स्पर्धा घेण्यात आली. अंतिम ३० स्पर्धकांची निवड करण्यात आली. त्या ३० स्पर्धकांत महाराष्ट्र राज्याची एकमेव स्पर्धक कु. स्वरांगी खानोलकर हिची शास्त्रीय नृत्यासाठी निवड झाली. मुंबई – बांद्रा येथे संपन्न झालेल्या सत्कार समारंभात बॉर्न टू शाईन ही ४ लाखाची स्कॉलरशिप, स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र देऊन मान्यवरांच्या हस्ते तिला गौरविण्यात आले