दिनांक १५ जानेवारी रोजी होणार निवडणूक आणि निकाल
लांजा | प्रतिनिधी : लांजा तालुक्यातील सहकार क्षेत्राचे केंद्रबिंदू म्हणून ओळखला जाणाऱ्या लांजा तालुका खरेदी विक्री संघा च्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या मंगळवारी ३ जानेवारी रोजी अखेरच्या दिवशी ६४ पैकी २७ जणांनी उमेदवारी अर्ज मागे घेतले. त्यामुळे आता १७ जागांसाठी ३७ उमेदवार रिंगणात राहिले आहेत.
लांजा तालुका खरेदी विक्री संघाची निवडणूक ही नेहमीच चर्चेची आणि लक्षवेधी ठरते. सलग पाच वर्षांची मुदत संपल्यानंतरही कोरोनाच्या काळामध्ये दोन वर्षांची संचालक मंडळाला वाढ देण्यात आली होती .त्यामुळे या निवडणुकीला आता फार काळ उशीर झाल्याने ही निवडणूक आता १५ जानेवारी रोजी होत आहे .संघाच्या एकूण १७ जागांसाठी यापूर्वी ६४ जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते. आज तीन जानेवारी रोजी उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या अखेरच्या दिवशी २७ जणांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतले. त्यामुळे आता संघाच्या १७ जागांसाठी ३७ उमेदवार हे रिंगणात राहिले आहेत.
दरम्यान संघाची निवडणूक ही १५ जानेवारी रोजी होणार आहे. या दिवशी सकाळी आठ ते सायंकाळी चार या वेळेत मतदान होणार असून याच दिवशी पाच नंतर मतमोजणी होऊन निकाल जाहीर करण्यात येणार आहे. संघाचे एकूण सभासद हे १६६४ इतके असून मतमोजणी ही खरेदी विक्री संघाच्या पहिल्या मजल्यावर होणार आहे. त्यामुळे आता १७ जागांसाठी ३७ म्हणजे जवळपास दुप्पट उमेदवार रिंगणात असल्याने या निवडणुकीत रंगत येणार आहे.