सावंतवाडीत ८ जानेवारी रोजी समाज साहित्य प्रतिष्ठान सिंधुदुर्गचे आयोजन
खुल्या कविसंमेलनात सिंधुदुर्गातील कवींनी सहभागी होण्याचे आवाहन
सावंतवाडी । प्रतिनिधी : समाज साहित्य प्रतिष्ठान सिंधुदुर्गतर्फे रविवार ८ जानेवारी रोजी सायंकाळी ५.३० वाजता सावंतवाडी श्रीराम वाचन मंदिर सभागृह येथे साहित्य विचार आणि सन्मान संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. ज्येष्ठ नाटककार प्रेमानंद गज्वी यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आलेल्या या संमेलनात विविध साहित्य पुरस्कारांचे वितरण, खुले कविसंमेलन आणि सत्कार आदी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती प्रतिष्ठांनचे अध्यक्ष मधुकर मातोंडकर आणि कार्यवाहक साटम यांनी दिली. समाज साहित्य प्रतिष्ठान सिंधुदुर्गतर्फे दरवर्षी विविध साहित्यिक उपक्रम राबविले जातात. काही महिन्यापूर्वीच समाज साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. त्यानंतर आता साहित्य विचार आणि सन्मान संमेलनाचे आयोजन नाटककार प्रेमानंद गज्वी यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले आहे. नाटककार गज्वी यांची भारतीय पातळीवरचे महत्त्वाचे मराठी नाटककार अशी ओळख आहे. त्यांच्या “घोटभर पाणी” या एकांकिकने प्रथम लक्ष वेधून घेतले. ही एकांकिका १४ भारतीय भाषांमध्ये अनुवादित झाली.
तेंडुलकर-मतकरी आणि पुढे आळेकर-एलकुंचवार यांच्यानंतर स्वातंत्र्योत्तर मराठी नाटकांत तिसऱ्या पिढीचे पर्व सुरू झाले. गज्वी हे त्या पर्वातले अग्रगण्य नाटककार. किरवंत, गांधी आंबेडकर, गांधी विरुद्ध गांधी’, वांझ माती’, ‘तनमाजोरी’ ‘जय जय रघुवीर समर्थ’, ‘पांढरा बुधवार’, ‘रंगयात्री’, ‘व्याकरण’ त्यांच्या आदी नाटकांनी भारतीय प्रेक्षकांना विचार प्रवृत्त केले. या संमेलनात त्यांच्या हस्ते ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते सुबोध मोरे यांना इतिहासकार गुरुवर्य कृष्णराव अर्जुन केळुसकर पुरस्कार, तर कथाकार विवेक कुडू यांना काशीराम आत्माराम साटम स्मृती समाज साहित्य कथा पुरस्कार आणि कवी एकनाथ पाटील यांना प्रकाश रामचंद्र रसाळ स्मृती भूमी काव्य पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे. यावेळी श्रीराम वाचन मंदिराचे नूतन कार्याध्यक्ष, सामाजिक कार्यकर्ते ऍड.संदीप निंबाळकर
यांचा विशेष गौरव नाटककार गज्वी यांच्या हस्ते करण्यात येणार आहे.संमेलनाच्या दुसऱ्या सत्रात कवी मोहन कुंभार यांच्या अध्यक्षतेखाली सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ज्येष्ठ आणि नव्या कवींचे खुले कविसंमेलन आयोजित करण्यात आले आहे. या कविसंमेलनात सहभागी होणाऱ्या कवीने पुढील व्यक्तींशी संपर्क करावा असे आवाहन करण्यात आले आहे.संपर्क मनीषा पाटील- (94228 19474), प्रा.प्रियदर्शनी पारकर-(94049 06570)