सावंतवाडी तालुकास्तरीय ५० वे विज्ञान प्रदर्शन यावर्षी मिलाग्रीस हायस्कूलमध्ये होणार

सावंतवाडी । प्रतिनिधी : सावंतवाडी तालुकास्तरीय ५० वे विज्ञान प्रदर्शन ९व १०डिसेंबरला मिलाग्रीस हायस्कूल,सावंतवाडी येथे आयोजित करण्यात आलेले आहे. सदर प्रदर्शनात इयत्ता सहावी ते आठवी आणि इयत्ता नववी ते बारावी असे दोन विद्यार्थ्यांचे गट असून या दोन्ही गटांतर्गत विज्ञान प्रतिकृती प्रदर्शन निबंध स्पर्धा वक्तृत्व स्पर्धा प्रश्नमंजुषा स्पर्धा विज्ञान प्रतिकृती प्रदर्शन या स्पर्धेचे यावेळी आयोजन करण्यात आले आहे.
अध्यापक निर्मित शैक्षणिक साहित्य प्रदर्शन व स्पर्धा माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षकांसाठी (इयत्ता नववी ते बारावी) अध्यापक निर्मित शैक्षणिक साहित्य प्रदर्शन व स्पर्धा प्राथमिक शिक्षकांसाठी (इयत्ता पहिली ते आठवी) आणि प्रयोगशाळा सहाय्यक/परिचर यांच्या प्रायोगिक साधनांचे प्रदर्शन व स्पर्धा आयोजित करण्यात आलेल्या आहेत.
सोमवार दिनांक ९ डिसेंबर रोजीचे नियोजन पुढीलप्रमाणे आहे- सकाळी ९.००ते १०.०० या वेळेमध्ये उपस्थिती नोंदणी केली जाणार आहे, त्यानंतर ११.००वाजेपर्यंत प्रतिकृतींची मांडणी करण्यात येणार आहे. सकाळी १०.३० ते दुपारी १.३०या वेळेमध्ये वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे वक्तृत्व स्पर्धेचे विषय प्राथमिक स्तरासाठी-सहावी ते आठवी- १)गणित माझा मित्र २)निसर्ग माझा मित्र.माध्यमिक स्तरासाठी- इयत्ता नववी ते बारावी-१)शाश्वत विकास आणि पर्यावरण २)गणितातील रंजकता[Maths in fun].स्पर्धेत इ.६वी ते ८वी गटातून प्रत्येक केंद्रातून १विद्यार्थी व इ.९वी ते १२वी गटातून प्रत्येक माध्यमिक शाळेतून १विद्यार्थी सहभागी होईल.

तर सकाळी ११.०० ते दुपारी १२.००या वेळेमध्ये निबंध स्पर्धा होणार आहे.निबंध स्पर्धेचे विषय प्राथमिक स्तरासाठी-इयत्ता सहावी ते आठवी-१) कोरोना प्रतिबंध व आरोग्याचे व्यवस्थापन २) दैनंदिन जीवनात पर्यावरणाचे महत्त्व.माध्यमिक स्तरासाठी-इयत्ता-नववी ते बारावी-१) समाज माध्यम आणि शिक्षण २) माहिती व संप्रेषण तंत्रज्ञानातील प्रगती. निबंध स्पर्धेत इ.६वी ते ८वी गटात प्रत्येक केंद्रातून १विद्यार्थी व इ.९वी ते १२वी गटातून प्रत्येक माध्यमिक शाळेतून १ विद्यार्थी सहभागी होईल. त्यानंतर दुपारी १.३० ते २.३० हा भोजन कालावधी ठेवण्यात आलेला आहे.दुपारी २.३० ते ३.३० या वेळेमध्ये उद्घाटन सोहळा पार पडणार असून दुपारी ३.३० ते संध्याकाळी ४.३०या वेळेमध्ये प्रदर्शन सर्वांना पाहण्यासाठी खुले ठेवण्यात येणार आहे.

मंगळवार दिनांक १० डिसेंबरचे नियोजन पुढील प्रमाणे आहे- सकाळी ९.०० ते दुपारी १.३० वाजेपर्यंत प्रश्नमंजुषा स्पर्धा होणार आहे. प्रश्नमंजुषा स्पर्धा देखील प्राथमिक स्तर-इयत्ता सहावी ते आठवी आणि माध्यमिक स्तर-इयत्ता नववी ते बारावी या दोन गटांमध्ये होणार असून ही स्पर्धा अभ्यासक्रमावर आधारित असणार आहे.प्रश्नमंजुषा स्पर्धेत इ.६वी ते ८वी गटातून प्रत्येक केंद्रातून २ विद्यार्थी तर इ.९वी ते १२वी गटातून प्रत्येक माध्यमिक शाळेतून प्रत्येकी २विद्यार्थी सहभागी होतील.सकाळी १०.०० ते दुपारी १.३० या वेळेमध्येच विज्ञान प्रतिकृती परीक्षण देखील पार पडणार आहे.दुपारी १.३० ते २.३० हा भोजन कालावधी ठेवण्यात आलेला असून दुपारी ठीक ३.००वाजता या विज्ञान प्रदर्शनाचे बक्षीस वितरण आणि समारोपाचा कार्यक्रम होणार आहे.
या विज्ञान प्रदर्शनातील कार्यक्रमांची सावंतवाडी तालुक्यातील सर्व प्राथमिक आणि माध्यमिक शाळांनी नोंद घ्यावी, असे आवाहन गटशिक्षणाधिकारी, पंचायत समिती-सावंतवाडी आणि मुख्याध्यापक-मिलाग्रीस हायस्कूल,सावंतवाडी यांनी केले आहे.