रत्नागिरी जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या पत्रकार पुरस्कारांचे थाटात वितरण

Google search engine
Google search engine

 

रत्नागिरी : पत्रकार हा समाजाचे प्रश्न मांडत असतो. समाजमाध्यमातून अनेक संदेश पाठवले जातात. पण ते सगळेच खरे असतात असे नाही. त्यामुळे समाजप्रबोधन आणि विश्वासार्ह माहिती देण्याचे काम वृत्तपत्रे करत असून पत्रकारांची भूमिका महत्त्वाची आहे, असे प्रतिपादन अप्पर जिल्हाधिकारी श्रीमती शुभांगी साठे यांनी आज केले.

रत्नागिरी जिल्हा मराठी पत्रकार संघामार्फत जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित पत्रकार पुरस्कार वितरण सोहळ्यात त्या बोलत होत्या. याप्रसंगी निवासी उपजिल्हाधिकारी श्रीकांत गायकवाड, प्रांताधिकारी विकास सूर्यवंशी, जिल्हा नियोजन अधिकारी सत्यविनायक मुळ्ये, तहसीलदार शशिकांत जाधव, जिल्हा माहिती अधिकारी प्रशांत दैठणकर उपस्थित होते. सुरवातीला संघाच्या अध्यक्ष मेहरून नाकाडे, सल्लागार राजेंद्र चव्हाण, सचिव राजेश कळंबटे आणि मान्यवरांच्या हस्ते दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला.

सचिव राजेश कळंबटे यांनी प्रास्ताविकात संघाच्या कामाचा थोडक्यात आढावा घेतला. पत्रकार मित्र गौरव पुरस्कार जिल्हा रुग्णालयात पाच हजारांहून अधिक प्रसुती शस्त्रक्रिया करणारे डॉ. विनोद सांगवीकर यांना, व्हिडिओ जर्नालिस्ट पुरस्कार कॅमेरामन नीलेश कदम यांना आणि पत्रकार राकेश गुडेकर यांना पत्रकार सन्मान गौरव पुरस्कार प्रदान केला. पत्रकार भूषण गौरव पुरस्कार सौ. सोनाली सावंत यांना प्रदान केला. त्यांच्यासमवेत पती पत्रकार संदेश सावंत हेसुद्धा उपस्थित होते. ज्येष्ठ पत्रकार प्रमोद कोनकर यांना पै. रशीदभाई साखरकर स्मृती पुरस्कार प्रदान केला. सत्कारमूर्तींच्या मानपत्रांचे वाचन मोरेश्वर आंबुलकर आणि विजय पाडावे यांनी केले. मानपत्रांचे लिखाण मीरा शेलार -भोपळकर यांनी केले होते.

या वेळी उपजिल्हाधिकारी गायकवाड म्हणाले की, सोशल मीडियावर आलेला मेसेज खरा आहे की खोटा याची खात्री करावी लागते. परंतु पत्रकारांकडून बातमी कळली तर ती वस्तुस्थितीदर्शक असते. पत्रकार प्रशासन, शासन व अधिकाऱ्यांची त्रुटी दाखवतात. जनसामान्यांचे प्रश्न प्रशासन व लोकप्रतिनिधींपर्यंत मांडतात आणि लोकशाही जीवंत ठेवण्याचे काम पत्रकार करत आहेत.

जिल्हा नियोजन अधिकारी सत्यविनायक मुळ्ये म्हणाले की, कोकणात प्रचंड साधनसंपत्ती आहे. तिचे जतन पुढील अनेक वर्षे केले पाहिजे. कोकणातून अनेक हुषार व्यक्ती बाहेर गेल्या व मोठ्या झाल्या. त्यांना परत बोलावले तर कोकण समृद्ध होईल. समाज कर्जाच्या खाईत आहे, त्यामुळे उत्पन्न वाढीसाठी छोटे छोटे प्रयोग केले पाहिजेत. गणपतीसाठी पर्यटन कोकणात सुरू होण्याची गरज आहे.

खो- खो महाराष्ट्र संघाच्या सहाय्यक प्रशिक्षक म्हणून निवडीबद्दल आणि संघाला मिळालेल्या यशाबद्दल राजेश कळंबटे यांचा सत्कार उद्योजक सौरभ मलुष्टे यांच्या हस्ते करण्यात आला.

याप्रसंगी ज्येष्ठ पत्रकार सतिश कामत, अभिजित हेगशेट्ये यांनी मनोगत व्यक्त केले. पत्रकारितेमधील टप्पे त्यांनी सांगितले. पुरस्कारप्राप्त पत्रकार कोनकर आणि सोनाली सावंत यांनी मनोगतामध्ये काळानुरूप बदललेली पत्रकारिता कशी करावी याबाबत माहिती दिली.

कार्यक्रमाचे सूत्रसंचलन अनघा निकम-मगदूम यांनी केले. सल्लागार राजेंद्र चव्हाण यांनी पत्रकारांची सुरक्षितता आणि त्यांच्या प्रश्नांकडे शासनाने लक्ष द्यावे, अशी मागणी त्यांनी केली. सचिन देसाई यांनी आभार मानले. या कार्यक्रमास ज्येष्ठ पत्रकार किशोर मोरे, संदीप तावडे, शोभना कांबळे, अभिनेत्री अनुया बाम, छायाचित्रकार कांचन मालगुंडकर, राजेश मयेकर, उन्मेश रोड्ये आदींसह पत्रकार संघाचे सर्व पदाधिकारी, सदस्य उपस्थित होते.