स्वतंत्र आरक्षणसाठी प्रांत कार्यालयावर विराट मोर्चा
संतोष कुळे | चिपळूण : कुणबी सेनेच्या वतीने चिपळूण येथील माटे सभागृहात सोमवार दि. ९ जानेवारी रोजी सकाळी १०.३० वाजता कोकणव्यापी निर्धार परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. या सभेपूर्वी कुणबी समाजाच्या स्वतंत्र आरक्षणासाठी व प्रलंबित मागण्यांसाठी बहादूरशेख नाका येथून प्रांत कार्यालयापर्यंत मोर्चा निघणार आहे.
कुणबी समाजाला स्वतंत्र आरक्षण मिळावे यासाठी ठाणे येथे दि. २८ नोव्हेंबर २०२२ रोजी कुणबी सेना प्रमुख विश्वनाथ पाटील यांच्या अध्यक्षतेखाली विराट मोर्चा व सभेचे आयोजन करण्यात आले होते. वरील भूमिकेला पाठिंबा देण्यासाठी कोकणात चिपळूण येथे निर्धार सभा व मोर्चाचे आयोजन केले आहे. कोकणात कुणबी समाजाची संख्या ६० ते ६५ टक्के या प्रमाणात असून आजही राजकीय सत्तेमध्ये कुणबी समाजाचे स्थान नगण्य आहे. त्यामुळे कुणबी समाजाचा सामाजिक, शैक्षणिक व आर्थिक विकास होत नाही. हा विकास होण्यासाठी कुणबी समाजाला स्वतंत्र आरक्षणाची गरज आहे. जेवढी ज्यांची लोकसंख्या तेवढ्या प्रमाणात त्या समाजघटकाला आरक्षण मिळणे गरजेचे आहे. स्वतंत्र आरक्षण मिळाले तरच कुणबी समाजाची शैक्षणिक व राजकीय स्तरारील आकडेवारी उंचावू शकते. मात्र, या घटकाला आरक्षण नसल्याने आजही कुणबी समाज दुर्लक्षित राहिला आहे. निवडणुकांच्यावेळी राजकारणातील विविध पक्ष व त्यांचे नेतेमंडळी कुणबी समाजाचा मतांसाठी वापर करून घेतात. मात्र, सत्तेवर बसल्यानंतर या समाजाकडे आजतागायत कुठल्याही राजकीय पक्षाने लक्ष देऊन त्यांच्या प्रगतीचा आलेख उंचावण्यासाठी ठोस भूमिका घेतलेली दिसून येत नाही. त्यामुळे कुणबी सेनाप्रमुख विश्वनाथ पाटील समाजाच्या हिताचा विचार करून स्वतंत्र आरक्षणाची मागणी केली आहे. त्याचबरोबर त्यांनी ओबीसी प्रवर्गाची जातनिहाय जनगणना करून कुणबी समाजाची स्वतंत्र लोकसंख्या जाहीर करावी.
ओबीसीमधून संख्येनुसार स्वतंत्र आरक्षण जाहीर करावे. त्याचबरोबर विश्वनाथ पाटील यांचा समावेश असलेल्या मोपलवार समितीचा अहवाल घोषित करावा आणि बेदखल कुळाचा प्रश्न राज्यपालांच्या आदेशाद्वारे सोडवून शहरालगत असलेल्या घरठाण्यांच्या जमिनी तातडीने नावे कराव्यात. कोकणातील कुणबी समाजाला त्यांचे आर्थिक मागासलेपण लक्षात घेऊन सन १९८२ मध्ये कै. शामराव पेजे यांनी शिफारस केल्याप्रमाणे घटनेचे कलम १५(४) व १६(४) अन्वये स्वतंत्र आरक्षण घोषित करावे. अशा विविध मागण्यांसाठी कोकणव्यापी निर्धार परिषद चिपळूण येथील माटे सभागृहात दि. ९ जानेवारी रोजी होत आहे. कुणबी समाजाचे अस्तित्व व अस्मितेच्या लढाईसाठी सभेपूर्वी बहादूरशेख नाका येथे सर्व समाजबांधवांनी सकाळी १०.३० वाजता एकत्र जमावे. त्यानंतर मागण्यांचा मोर्चा घेऊन बहादूरशेख ते प्रांत कार्यालयापर्यंत प्रचंड जनसमुदायाने हा मोर्चा काढण्यात येईल. या मोर्चा व निर्धार परिषदेसाठी सर्व कुणबी समाजबांधवांनी मतभेद विसरून उपस्थित रहावे, असे आवाहन महाराष्ट्र सदस्य दादा बैकर, विलास खेराडे, कोकण विभागीय अध्यक्ष सुरेश भायजे,जिल्हा संघटक चंद्रकांत परवडी, जिल्हाध्यक्ष विकास गुडेकर, जिल्हा सरचिटणीस प्रदीप उदेग, जिल्हा प्रवक्ता गजानन वाघे व चिपळूण तालुकाप्रमुख संजय जाबरे व पदाधिकाऱ्यांनी केले आहे.